मधमाश्यांच्या हल्ल्यात पोलिस पाटील जखमी; पर्यटकांसह स्थानिक धरणग्रस्त भयभीत | पुढारी

मधमाश्यांच्या हल्ल्यात पोलिस पाटील जखमी; पर्यटकांसह स्थानिक धरणग्रस्त भयभीत

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: कोसळलेल्या झाडाच्या फांद्या तोडताना आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात कोशीमघरचे पोलिस पाटील गेनबा लक्ष्मण कडू जखमी झाले आहेत. पानशेत धरण भागातील पुणे-घोल रस्त्यावर कोशीमघर गावाजवळ घडलेल्या घटनेमुळे पर्यटकांसह स्थानिक धरणग्रस्त भयभीत झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून कोसळलेल्या झाडावर आग्या मोहोळचा मुक्काम आहे.

मधमाश्यांच्या दहशतीमुळे स्थानिक गुराखी, शेतकर्‍यांना शेतशिवारात ये-जा करताना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागही मधमाश्यांच्या दहशतीमुळे हतबल झाले आहे. बुधवारी (17) दुपारी कोशीमघर गावाजवळील शेंदरीच्या माळावरील पानशेत-घोल रस्त्यावर एक मोठे झाड कोसळले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. झाडाच्या फांद्या तोडून बाजूला काढण्यासाठी कोशीमघर गावातील ग्रामस्थांनी भरपावसात धाव घेतली.

लहान फांद्या तोडल्या, नंतर अचानक मोठ्या फांदीवर बसलेल्या आग्या मोहोळच्या मधमाश्यांनी तुफान हल्ला सुरू केला. त्यामुळे फांद्या तोडण्याचे काम अर्धवट टाकून ग्रामस्थांनी घराकडे धाव घेतली. स्थानिक शेतकरी रमेश कडू म्हणाले, ‘मोठ्या पोत्याच्या आकाराचे आग्या मोहोळ आहे. मधमाश्यांना धक्का लागल्याने त्या सावध झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ घाबरले आहेत.’

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय संकपाळ म्हणाले, ‘झाड काढण्यासाठी जेसीबी मशीन सज्ज केली आहे. मोहोळ मोठे आहे. त्यामुळे सावधगिरीने झाड रस्त्यावरून बाजूला हटविण्यात येणार आहे. सध्या या भागात जोरदार पाऊस पडत आहे. पाऊस कमी झाल्यावर तातडीने झाड हटविण्यात येणार आहे.’

Back to top button