आता जाहिरात कंपन्यांनाच दणका; अनधिकृत फलकांबाबत थेट कारवाई करण्याचा महापालिकेचा निर्णय | पुढारी

आता जाहिरात कंपन्यांनाच दणका; अनधिकृत फलकांबाबत थेट कारवाई करण्याचा महापालिकेचा निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात अनधिकृत जाहिरातबाजी करणार्‍यांवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, त्याला आळा बसत नाही. त्यामुळे महापालिकेने आता अनधिकृत जाहिरात फलकावर जाहिरात प्रदर्शित करणार्‍या कंपन्यांवरच कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने पाच महिन्यांत 140 अनधिकृत जाहिरात फलकांसह एकूण 1 लाख 33 हजार 971 कारवाया केल्या आहेेत.
महापालिका हद्दीत जाहिरात करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते; तसेच जाहिरात फलक (होर्डिंग) उभे करण्यासही सशुल्क परवानगी दिली जाते. दरवर्षी या परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक ठिकाणी अनधिकृतपणे जाहिरात फलक, फ्लेक्स उभे केले जातात आणि शहराचे विद्रुपीकरण केले जाते. शिवाय महापालिकेचे उत्पन्न बुडविले जाते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग), बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, पोस्टर, निष्कासन कारवाईसाठी एका संस्थेची नेमणूक केली आहे. शहरातील अधिकृत आणि अनधिकृत जाहिरात फलकांवर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, सराफ, वस्त्र विक्रेते, तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ब्रँड म्हणून ओळख असणार्‍या वस्तूंच्या उत्पादक कंपन्यांच्या जाहिराती झळकत असतात. यापैकी अनधिकृत जाहिरात फलकांवर जाहिरात प्रदर्शित केल्यास संबंधित व्यावसायिक, उत्पादक कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. विनापरवाना बोर्ड, बॅनर लावल्यास संबंधित मंडप व्यावसायिक आणि फ्लेक्स प्रिंटिंग मशिनरी व्यावसायिकावरही कारवाई केली जाणार आहे.

पाच महिन्यांत 1 लाख 33 हजार 971 कारवाया
महापालिकेने चालू आर्थिक वर्षात 1 लाख 33 हजार 971 अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर आदींवर कारवाई केली आहे. या कारवाईतून 5 लाख 70 हजार दंड वसूल केला आहे, तर 4 गुन्हे दाखल केले आहेत. विविध पोलिस ठाण्यांत 47 तक्रारी प्रलंबित आहेत.

सिटी पोस्टालगतचे 40 स्टॉल्स सील
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने सिटी पोस्टलगतच्या गल्लीतील 40 स्टॉल्स सील केले आहेत. येथील बहुतांश स्टॉल्स भाड्याने दिल्याने, तसेच प्रमाणापेक्षा अधिक आकाराचे बांधल्याने ही कारवाई करण्यात आली.

Back to top button