पिंपरी : महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 5 कंपन्यांच्या निविदा | पुढारी

पिंपरी : महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 5 कंपन्यांच्या निविदा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेची 312 कोटी खर्चाची पर्यावरणपूरक 18 मजली नवीन प्रशस्त प्रशासकीय इमारत चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील मोकळ्या जागेत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, एक ते दीड महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. महापालिकेची पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर पिंपरी येथे चार मजली मुख्य इमारत आहे. इमारतीस 35 वर्षे झाले आहेत. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सन 1981 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 2 लाख 49 हजार 364 होती. आता ती 27 लाखांच्या पुढे गेली आहे.

शहराची वाढती लोकसंख्येमुळे पालिकेवर नागरी सेवा व सुविधा पुरविण्याचा ताण पडत आहे. तसेच, पालिका इमारत कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने अनेक विभागाचे कार्यालये इतर ठिकाणी आहेत. पालिकेची एकाच ठिकाणी सुसज्ज इमारत असावी म्हणून सायन्स पार्कसमोर जागा निश्चित झाली आहे. त्या कामाची निविदा प्रशासकीय राजवटीत काढण्यात आली आहे. अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., बी. जी. शिर्के कॅन्स्ट्रक्शन टेक्नॉलाजी प्रा. लि., केएमव्ही प्रोजेक्टस लिमिटेड, केपीसी प्रोजेक्टस लिमिटेड आणि रामा सिव्हील इंडिया कॅन्स्ट्रक्शन प्रा. लि. या पाच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदेची पुढील प्रक्रिया अद्याप सुरू आहे. पात्र ठरणार्‍या ठेकेदार कंपनीस काम दिले जाईल. त्यास महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे

Back to top button