

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यात दर्शविलेल्या आरक्षणावरून नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाले होते. पीएमआरडीएने ते गैरसमज दूर केले आहेत. काही गट क्रमांकांवर 'पी' असे दर्शविण्यात आले असून, हे आरक्षण नसून गट नंबरचे भाग झाल्यामुळे (पार्ट) किंवा पैकीचे क्षेत्र असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर अॅग्रिकल्चर झोन (ग्रीन झोन-2) हे आरक्षण नसून ते सिंचन लाभक्षेत्रातील जमीन असल्यामुळे तेथे शेतीसह विविध प्रकारच्या वापरासाठी ते दर्शविण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान प्रारूप विकास योजनेमध्ये काही ठिकाणी गट नंबरसोबत दर्शविण्यात आलेल्या 'पी' अक्षरावरून नागरिकांमध्ये पार्किंगचे आरक्षण दर्शविण्यात आलेले आहे का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच अॅग्रिकल्चर झोन (जी-2) मधील वापर विभागाबाबत माहितीबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे.
त्यावरून पीएमआरडीएकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे.ग्रीन झोन 2 मध्ये पाळीव प्राण्यांचे तबेले, वराहपालन, कुक्कुटपालन केंद्र आनुषंगिक इमारती, तंबू इत्यादींसह सर्व कृषी वापर; वनीकरण, रोपवाटिका, किमान 1 एकर क्षेत्रामध्ये 0.04 चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मर्यादेत शेतघर बांधकाम; तर कमाल चटई क्षेत्र निर्देशांकाच्या 0.20 टक्के मर्यादेत शैक्षणिक, संशोधन आणि वैद्यकीय संस्थांच्या इमारतींचा विकास, समाजविकास, मानव संसाधन विकास, ग्रामीण उत्थान, योग आश्रम, ध्यान केंद्रे, विपश्यना केंद्रे, आध्यात्मिक केंद्रे, गोशाळा, पांजरपोळ, वृद्धाश्रम आणि पुनर्वसन केंद्रे, एकात्मिक महामार्ग सुविधा जसे हॉटेल्स, रस्त्यालगतचे उपाहारगृह, इंधन भरण केंद्र, सर्व्हिस स्टेशन, उपाहारगृह, सर्व्हिस स्टेशन, हायवे मॉल, अपघात उपचार केंद्र, औषध दुकान, बँक एटीएम, सहायक उद्योग, मत्स्यपालन, टुरिस्ट होम्स, रिसॉर्ट, हॉटेल्स, मोटेल्स आदीसाठी वापर करता येईल. तसेच गावठाण हद्दीपासून पाचशे मीटरच्या आत असल्यास अधिमूल्य भरून रहिवास व आनुषंगिक वापर करता येणार आहे, असेही पीएमआरडीएने सांगितले आहे.