देवेंद्र फडणवीसांना पुण्यात उमेदवारी द्या; ब्राह्मण महासंघाचे जे. पी. नड्डा यांना पत्र | पुढारी

देवेंद्र फडणवीसांना पुण्यात उमेदवारी द्या; ब्राह्मण महासंघाचे जे. पी. नड्डा यांना पत्र

पुणे पुढारी वृत्तसेवा: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सक्षम नेतृत्व म्हणून जी मोजकी नावे आहेत, त्यात सर्वांत तरुण नेते म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. त्यामुळे त्यांना पुणे शहरातून खासदारकीची उमेदवारी दिल्यास निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ,’ अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना एका पत्राद्वारे केली आहे.

गोविंद कुलकर्णी यांनी हे पत्र हिंदी भाषेत लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘देवेंद्र फडणवीस हे पक्षातील अत्यंत बुद्धिमान नेते आहेत. मागील पाच वर्षांत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अत्यंत सक्षम व प्रभावीपणे काम केले. त्यांना उपमुख्यमंत्री केल्याने नाराजी पसरली होती. मात्र, त्यांना आता पक्षाच्या संसदीय समितीत स्थान देऊन पक्षाने मोठा गौरव करून राष्ट्रीय पातळीवर चमक दाखविण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले अभिनंदन.’

या पत्रात पुढे म्हटले आहे की, ‘पुणे शहरातील ज्या खासदारांच्या पाठीशी आमची संघटना भक्कमपणे उभी राहिली, ते सर्व मोठ्या मताधिक्याने निवडून आले. खासदार गिरीश बापट, माजी खासदार सुरेश कलमाडी व अनिल शिरोळे यांना निवडून आणण्यात आमच्या संघटनेने मोठी भूमिका बजावली आहे. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवायचे असेल, तर पुणे योग्य आहे.
या शहरातून खासदारकी द्यावी, आम्ही त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ.’

चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आज बैठक
पुणे शहरातील दुसर्‍या ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांच्या नेतृत्वाखाली चहापानाची बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील महात्मा सोसायटीतील निवासस्थानी सकाळी 9 वाजता होणार आहे. ही सदिच्छा भेट असून, नवीन सरकारकडून आमच्या अपेक्षा मांडण्यासाठी जाणार आहोत, अशी माहिती दवे यांनी पाठवलेल्या संदेशात दिली आहे.

Back to top button