धायरी : दहीहंडीच्या उत्सवात नाचताना कोयत्याने वार; हवेत गोळीबार | पुढारी

धायरी : दहीहंडीच्या उत्सवात नाचताना कोयत्याने वार; हवेत गोळीबार

पुणे/धायरी : दहीहंडीच्या उत्सवात नाचत असताना पूर्ववैमनस्यातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर पालघनने वार केले. त्यानंतर एका सराइताने हवेत गोळीबार केला. शुभम जयराज मोरे (रा. महादेवनगर, वडगाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री वडगाव भागात ही घटना घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, तर ओंकार लोहकरे असे गोळीबार करणार्‍या आरोपीचे नाव आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री सव्वासात ते साडेसातच्या सुमारास तुकाईनगर परिसरात असणार्‍या कॅनॉल शेजारील रस्त्यावर घडली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावमधील एका दहीहंडी उत्सवात शुभम जयराज मोरे (रा.महादेवनगर वडगाव) हा त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. यावेळी आरोपी चेतन ढेबे, ओंकार लोहकरे, अनुराग चांदणे, ज्ञानेश्वर जाधव, बाला धेबे, साहिल उघडे, वैभव साबळे व त्यांचे सात ते आठ मित्र यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मोरे याला मारहाण केली.

यावेळी आरोपी लोहकरे याने त्याच्या जवळील पिस्तूलने हवेत गोळीबार केला, तर चेतन ढेबे याने मोरे याच्या मानेवर पालघनने वार करून जखमी केले. आरोपींनी मारहाण करत या भागात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी यातील आरोपी बाला ढेबे याच्यासह त्याच्या काही साथीदारांना तत्काळ पाठलाग करून पकडले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली.

Back to top button