पुणे : दुय्यम निबंधक कार्यालये सुटीच्या दिवशी सुरू राहणार | पुढारी

पुणे : दुय्यम निबंधक कार्यालये सुटीच्या दिवशी सुरू राहणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दस्तनोंदणीसाठी काही दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी व रविवारी सुरू राहणार आहेत. ‘सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री पावणेनऊपर्यंत आता नागरिकांना दस्तनोंदणी करता येणार आहे,’ अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी दिली. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शनिवार व रविवारी सुरू असलेली कार्यालये बंद करण्यात आली होती, तसेच सकाळच्या व दुपारच्या सत्रात सुरू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वेळेत बदल करण्यात आला होता.

सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सकाळी 9.45 ते 6.15 या वेळेत सुरू ठेवण्यात येत होती. नागरिकांच्या सोयीसाठी दस्त नोंदणीची सुविधा शनिवार व रविवारीसुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘पुणे व पिंपरी-चिंचवडमधील 27 कार्यालयांपैकी 7 कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उर्वरित कार्यालये सकाळी 9.45ते 6.15 या वेळेत सुरू राहणार आहेत,’ असे पारखे यांनी सांगितले.

Back to top button