पुणे : 18 ते 59… बूस्टरबाबत बेफिकीर! फक्त सात टक्के नागरिकांनी घेतला डोस | पुढारी

पुणे : 18 ते 59... बूस्टरबाबत बेफिकीर! फक्त सात टक्के नागरिकांनी घेतला डोस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोना लसीच्या मोफत बूस्टर डोस मोहिमेत आतापर्यंत 42 टक्के आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील 39 टक्के कर्मचारी, 18 ते 59 वर्षे वयोगटातील 7 टक्के, तर 60 वर्षे आणि त्यावरील 27 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्रांवर 15 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान 3 लाख 44 हजार 585 नागरिकांना पहिला, 7 लाख 13 हजार 544 नागरिकांना दुसरा, तर 31 लाख 93 हजार 11 नागरिकांना वर्धित मात्रा देण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ज्या लाभार्थ्यांकडे ओळखपत्र नाही, असे जेलमधील कैदी, भटक्या जमाती, मनोरुग्ण संस्थेतील लाभार्थी, भिकारी, वृद्धाश्रमातील लाभार्थी, रस्त्यालगत राहणारे, पुनर्वसन शिबिरात राहणारे इत्यादीसाठी कोविड लसीकरण विशेष सत्र आयोजित केले जात आहे. लसीकरण कमी असलेली गावे, जिल्हा, महानगरपालिका तसेच तालुकास्तरावर टास्क फोर्स बैठकांचे आयोजन, कोविन प्रणालीच्या सहाय्याने लाभार्थ्यांची यादी करून प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली.

हर घर दस्तक, मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ अभियान अशा मोहिमा राबवल्या जात आहेत. हर घर दस्तक अभियान 2.0 हे 1 जून ते 31 जुलै या कालावधीत राबविण्यात आले. याअंतर्गत 12 ते 18 वयोगटातील 3 लाख 32 हजार 640 जणांना पहिला डोस, 4 लाख 21 हजार 74 जणांना दुसरा, तर 18 वर्षांवरील 9 लाख 27 हजार 777 जणांना दुसरा डोस, 60 वर्षांवरील 9 लाख 95 हजार 139 नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला.

कोरोना नियंत्रणासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे आणि दोन्ही डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी नागरिकांनी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेस चांगले सहकार्य केले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी गाफील राहून चालणार नाही. कोविड लसीकरणाच्या अमृत महोत्सवात सहभागी होऊन लसीची वर्धित मात्रा घेऊन कोरोनावर पूर्णपणे मात करूया.
– डॉ.सचिन देसाई, लसीकरण अधिकारी, महाराष्ट्र राज्य

 

 

Back to top button