पिंपरी : घंटागाडीने वेळ चुकविल्यास कारवाई, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाचे पाऊल | पुढारी

पिंपरी : घंटागाडीने वेळ चुकविल्यास कारवाई, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाचे पाऊल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील अनेक भागात घंटागाडी वेळेवर पोहचत नाहीत. कधी सकाळी तर, कधी दुपारी येते. त्या संदर्भात अनेक तक्रारी आहेत. घंटागाडीवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम व जीपीएस यंत्रणेद्वारे 24 तास नजर ठेवण्यात येणार आहे. नेमलेल्या वस्ती व कॉलनीमध्ये वेळेवर घंटागाडी नसल्याचे आढळून आल्यास आरोग्य विभागाकडून चालकांवर कारवाई केली जाणार आहे. पालिकेने सन 2009 मध्ये घंटागाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवली होती. त्याचे नियंत्रण केवळ क्षेत्रीय कार्यालयांमधून होत आहे.

वाहने कुठे आहेत, कोणत्या गल्लीमधून गेली आहेत, याबाबतची माहिती कर्मचार्‍यांचे पर्यवेक्षक व क्षेत्रीय कार्यालयामध्ये समजत होती. त्यामुळे तक्रारी आल्या तरी त्यांचे निरसन वेळेत होत नव्हते. घंटागाडी वेळेवर येत नसल्याच्या नागरिकांसह नगरसेवकांच्या वाढत्या व नियमित तक्रारी आहेत. त्यासाठी आता सर्व घंटागाड्यांना आरोग्य विभागाच्या वतीने व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून ते वाहन कुठे आहे, याची माहिती मिळते. त्यासाठी आता डॅश बोर्ड विकसित करण्यात येणार आहे.

ज्या भागात नाही तेथे घंटागाडी पाठविणार
शहरातील काही भागातून कचरा उचलला नसल्याच्या तक्रारी येतात. तसेच, घंटागाडी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी सोडविण्यासाठी घंटागाड्यांवर 24 तास नजर ठेवण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून एका भागामध्ये किती वेळा घंटागाडी जाते की जातच नाही, याची माहिती उपलब्ध होणार आहे. ज्या भागात घंटागाडी जात नाही, तेथे ती पाठविली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

Back to top button