शेती विभागाचा भोंगळ कारभार; श्री नीलकंठेश्वर ट्रक, ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेचे गंभीर आरोप | पुढारी

शेती विभागाचा भोंगळ कारभार; श्री नीलकंठेश्वर ट्रक, ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेचे गंभीर आरोप

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाला मागील काही गाळप हंगामापासून ग्रहण लागले असून, या विभागातील काही बेबंद आणि भ्रष्टाचारी कर्मचार्‍यांच्या चुकीच्या पद्धतीने कामकाज करण्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासद तसेच गेटकेन धारकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. कारखान्याचे होणारे नुकसान आणि बदनामी याला जबाबदार असणार्‍या कर्मचार्‍यांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी श्री नीलकंठेश्वर ट्रक, ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेनी केली आहे.

बाहेरील ऊस वाहतूकदाराना संगमताने बोगस करार करून देणे, ऊस वाहतूकदारांना ऊस तोडणी टोळी ठरवताना बैलगाडी, ट्रॅक्टर – गाडी, ट्रॅक्टर – ट्रेलर,ट्रक असे विविध प्रकारच्या वाहतुकीचे करार करताना कारखान्यामार्फत लाखो रुपयांची उचल दिली जाते, याचाच फायदा उठवत काही बाहेरील ऊस वाहतूकदार कारखाना कर्मचार्‍यांना हाताशी धरून संगमतने टोळी नसली तरी दोन तीन बोगस करार करून कारखान्याची उचलीपोटी मिळणारी लाखो रुपयांची रक्कम घेऊन वापरतात, ही रक्कम वसूल करण्यासाठी कारखाना प्रशासनाला प्रयास करावा लागतो, याला जबाबदार कोण, असा सवाल संघटना करत आहे. स्थानिक ऊस वाहतूकदारांना मात्र नाहक जाचक अटी व नियम लावून त्यांच्या मुलाखती घेऊन वेठीस धरले जात असल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे.

काही कर्मचार्‍यांकडून गाळप हंगामात तुटण्यास योग्य नसणारा ऊस गैर प्रकार करून तोडून गाळप आणण्याचे प्रकार झाले आहेत. कारखान्याच्या गाळप हंगामाच्या शेवटाला ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन काही कर्मचारी तसेच टोळी मुकादम पैसे उकळण्याचे काम करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अधिकारी पैसे घेऊन ऊस तोडी देत असल्याचा गंभीर आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. माळेगाव कारखान्याच्या नावलौकिकास काळिमा फासण्याचे काम काही कर्मचारी करत आहेत.

भविष्यात टोळ्या फसल्या आणि ऊसतोड यंत्रणा कमी आली तर संस्थेच्या तसेच वाहतूकदारांच्या होणार्‍या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल संघटनेच्या वतीने करण्यात येऊन संबंधित कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करून त्यांना निलंबित करावी, अशी मागणी केली आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे,उपाध्यक्ष सागर तावरे,संजय खलाटे,सुनील देवकाते,सचिन मोटे,गणेश जगताप,वैजनाथ देवकाते,भालचंद्र देवकाते आदी उपस्थित होते.

माळेगाव कारखान्याचे वेगळे नाव आहे, अशावेळी काही भ्रष्ट कर्मचार्‍यांमुळे बाहेरील ऊस वाहतूकदारांकडे जवळपास चार ते पाच कोटी रुपयांच्या दरम्यान उचल बाकी असून याला जबाबदार कोण? संस्थेचे नुकसान होत असेल तर कारखाना अध्यक्षांनी स्वतः जातीने लक्ष घालून संबंधित कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करावी.

            -प्रकाश सोरटे, अध्यक्ष, श्री नीलकंठेश्वर ट्रक, ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटना

 

Back to top button