कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध; सोमेश्वर परिसरात शेतकर्‍यांची एकजूट | पुढारी

कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध; सोमेश्वर परिसरात शेतकर्‍यांची एकजूट

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: जलसंपदा विभागाकडून सुरू असलेल्या निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला शेतकर्‍यांचा आता विरोध वाढू लागला आहे. सुरुवातीला पणदरे ग्रामस्थांनी एकत्र येत अस्तरीकरणाला विरोध केला. बारामतीच्या पश्चिम भागातील शेतकर्‍यांनाही आता एकजूट होत याविरोधात आवाज उठवण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव करण्याची मागणी होत आहे.
करंजेपूल येथे निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून बागायती पट्ट्यातील शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसणार आहे. कालव्यातून पाणी वाया जात असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. मात्र, कालव्याची दुरुस्ती करून आतील गाळ काढून तो स्वच्छ करावा यामुळे पाणीगळती थांबणार आहे. मात्र अस्तरीकरण नको असे शेतकरी म्हणू लागले आहेत.

एकूण 152 किलोमीटर लांबी असलेल्या डाव्या कालव्यावर दर पाच किलोमीटर अंतरावर 400 मीटरचे काँक्रिटीकरण होणार आहे. ज्या ठिकाणी पाणीगळती होत आहे अशा ठिकाणी हे काँक्रिटीकरण केले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. अस्तरीकरणामुळे सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती कारखाना कार्यक्षेत्रातील हजारो हेक्टर उसाची शेती अडचणीत येणार आहे. याशिवाय तरकारी पिके, भाजीपाला, फळबागा, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

शेतीला पाणी कमी पडल्यास शेती माळरान होऊन शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. शेकडो शेतकर्‍यांनी कालव्याशेजारी जमिनी घेऊन विहिरी पाडून शेतीला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. गावातील अनेक बोअर, तलाव आणि विहिरीचं पाणी कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता आहे. याशिवाय शेकडो हेक्टर्वरील ऊसशेती धोक्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची कायमची समस्या निर्माण होणार असून दुग्ध व्यवसाय आणि पोल्ट्री व्यवसाय व शेतीपूरक उद्योग संकटात येणार आहेत. याबाबत कण्हेरी येथील हनुमान मंदिरात बारामती शहराजवळील शेतकर्‍यांच्या बैठकीचे आयोजन शुक्रवारी (दि.19) करण्यात आले आहे. यात अस्तरीकरणाला विरोध होण्याची शक्यता आहे.

 

Back to top button