सस्तेवाडी स्मशानभूमीस रस्ता नसल्याने गैरसोय | पुढारी

सस्तेवाडी स्मशानभूमीस रस्ता नसल्याने गैरसोय

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेणे कठीण झाले आहे. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला असला तरी अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही.
निरा-बारामती रस्त्यावर चोपडज पुलानजीक सस्तेवाडी गावच्या हद्दीतील ही स्मशानभूमी गेली अनेक वर्षे दुर्लक्षित आहे. स्मशानभूमी व लगतच्या परिसराला बाभळींचा वेढा पडला आहे. शेजारून निरा डावा कालवा जात असल्याने तेथील पाणी गळतीमुळे डबकी तयार झाली आहेत. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

एखादी व्यक्ती मयत झाल्यास तो मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना डबक्यातून व बाभळीतून वाट काढावी लागते. या स्मशानभूमीचा वापर सदोबाचीवाडी, सस्तेवाडी व वडगाव निंबाळकर येथील ग्रामस्थांकडून केला जातो. सदोबाचीवाडीचे माजी उपसरपंच सुधीर सणस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही पत्र देत रस्त्याची मागणी केली होती. त्यानंतरही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सणस यांनी आता पुन्हा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व सस्तेवाडी ग्रामपंचायतीला पत्र देत रस्त्याची मागणी केली आहे.

Back to top button