सासवड ते जेजुरी प्रवास जीवघेणा | पुढारी

सासवड ते जेजुरी प्रवास जीवघेणा

सासवड; पुढारी वृत्तसेवा: पुणे – पंढरपूर पालखी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे सासवड ते जेजुरी प्रवास जीवघेणा झाला आहे. पालखी महामार्गावर सासवड ते जेजुरी या 17 किलोमीटरच्या रस्त्यावर सासवड, बोरावके मळा, खळद, शिवरी, साकुर्डे, जेजुरी आदी ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी या रस्त्याला साईड पट्ट्याच राहिल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. खड्डे वाचवण्याच्या नादात अनेक अपघात होत आहेत.

दरम्यान, पालखी महामार्गाची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी प्रवासी तसेच महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांनी केली आहे.
पालखी महामार्गावर सासवड ते जेजुरीदरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी पुलांची, रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जीवघेणा प्रवास थांबवण्यासाठी हा रस्ता तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे.

पालखी महामार्गाचे 2013 मध्ये राज्य शासनाच्या वतीने रुंदीकरणाचे काम सुरू झाले. त्यानंतर चुकीचे व शेतकर्‍यांना विश्वासात न घेता भूसंपादन प्रक्रिया राबविल्यामुळे अर्धवट अवस्थेत राज्य शासनाला हे काम बंद करावे लागले. तेव्हापासून अनेक ठिकाणी पुलाची कामे, जोड रस्त्याची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. संबंधित रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित झाला आहे. काही ठिकाणचा शेतकर्‍यांचा विरोध कमी झाला असला, तरी रस्त्याच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने रस्त्याची स्थिती जैसे थे आहे.

 

Back to top button