

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे. टेमघर धरण 99.09 टक्के म्हणजे जवळपास भरले आहे. टेमघर वगळता सर्व धरणांतून विसर्ग सुरू आहे. गुरुवारी (दि.18) सायंकाळी पाच वाजता खडकवासलातून 9416 क्युसेकने विसर्ग सुरू होता. वरसगाव, पानशेत, टेमघर धरणक्षेत्रात रिमझिमनंतर उघडीप आहे, तर खडकवासला, सिंहगड भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. डोंगरकड्यासह नद्या, ओढे – नाल्यांतून पाण्याचे प्रवाह सुरू आहेत. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू आहे.
29.15 टीएमसी क्षमतेच्या धरणसाखळीत 29.11 टीएमसी म्हणजे 99.88 टक्के साठा झाला आहे. पानशेतमधून 3908 व वरसगाव मधून 2346 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, धरणे शंभर टक्के भरल्याने धरणात येणारे जादा पाणी सोडण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 10, वरसगाव व पानशेत येथे प्रत्येकी 4 व खडकवासला येथे 1 मिलिमीटर पाऊस पडला.
पाणीसाठा
खडकवासला 100 टक्के
पानशेत 100 टक्के
वरसगाव 100 टक्के
टेमघर 99.09 टक्के