पिंपरी : जलद गतीने सेवा पुरविण्यावर भर देणार : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह | पुढारी

पिंपरी : जलद गतीने सेवा पुरविण्यावर भर देणार : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुण्यापेक्षा अधिक वेगाने पिंपरी-चिंचवड शहर वाढत आहे. विकसित होत आहे. त्या दृष्टीने विचार करून नागरिकांना चांगल्या सेवा व सुविधा जलद गतीने पुरविण्यावर भर देणार आहे. पाणी, कचरा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षणासोबत नवीन प्रकल्पांवर अधिक ‘फोकस’ असेल, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी (दि.18) दिली. आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेखर सिंह म्हणाले की, शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याबाबत माहिती घेऊन नियोजन केले जाईल. बेशिस्त तसेच, लाचखोर अधिकारी व कर्मचार्‍यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

शहराची गरज ओळखून पुनावळे कचरा डेपोसह इतर प्रकल्पांबाबत कार्यवाही करू, असे त्यांनी स्पष्ट केले. शहराचा अभ्यास करून कामाचा प्राधान्यक्रम ठरविणार येईल. त्यानुसार कामकाजाचे नियोजन केले जाईल. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेली सारथी मॉडेल यापुढे ही अधिक सक्षमपणे सुरू ठेवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

अधिकार्‍यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे
प्रामाणिकपणा, कामाप्रती एकनिष्ठता व कर्तव्यनिष्ठता महत्वाची आहे. पालिकेच्या सर्व अधिकार्‍यांनी नागरिकांशी सौजन्याने वागत आपली सेवा बजवावी, अशी सूचना बैठकीत आयुक्त सिंह यांनी अधिकार्‍यांना केली.

नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेणार
मोबाईलवर एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप किंवा सारथी हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच, सूचना व सल्ल्यांची तत्काळ दखल घेतली जाईल. शहराच्या विकासासाठी व नवीन उपयुक्त संकल्पनेकरिता नागरिक, तज्ज्ञ, अनुभवी मंडळी, लोकप्रतिनिधींच्या सूचना व सल्ल्यांचे स्वागत आहे, असे ते म्हणाले.

Back to top button