65 व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर सायकल स्पर्धा; हडपसरच्या दशरथ जाधव यांचा विक्रम

जगातील अत्यंत खडतर लंडन-इडनबर्ग-लंडन सायकल स्पर्धेदरम्यान दशरथ जाधव.
जगातील अत्यंत खडतर लंडन-इडनबर्ग-लंडन सायकल स्पर्धेदरम्यान दशरथ जाधव.

हडपसर; पुढारी वृत्तसेवा: हडपसर येथील उद्योजक दशरथ जाधव यांनी जगातील अत्यंत खडतर अशी लंडन- इडनबर्ग- लंडन सायकल स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करून नवीन इतिहास रचला. लंडन – इडनबर्ग – लंडन ही ब्रिटनमधील सर्वांत अवघड सायकलिंग स्पर्धा आहे. या स्पर्धेत स्पर्धकांना 1520 किमी सायकलिंग केवळ 128 तासांत पूर्ण करायचे असते. यामध्ये सायकलिंग आणि विश्रांती दोन्ही वेळ धरली जाते. यामध्ये एकूण 20 कंट्रोल पॉईंट्स होते आणि दोन कंट्रोल पॉईंट्समधील अंतर कोणत्याही सोयी किंवा मदतीशिवाय तेही ठराविक वेळेतच पूर्ण करायचे असते.

स्पर्धा चालू असताना नियमानुसार लहान चूक झाली तरी स्पर्धकाला बाद ठरविले जाते. या स्पर्धेत स्पर्धकाला शारीरिक तसेच मानसिक असा दोन्हीचा समतोल साधत, जवळपास 47,564 फूट चढ आणि 47,563 फूट उतार असलेल्या डोंगराळ रस्त्यावरून, ऊन, वारा, पाऊस असतानादेखील अतिशय किचकट परिस्थितीत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. भारतातील स्पर्धकांना ही स्पर्धा पूर्ण करताना वातावरणाचा सर्वांत महत्त्वाचा अडसर असतो. कारण, युरोप खंडातील आणि आपल्यालाकडील वातावरण यात मोठा फरक असून, तेथील पाऊस, ऊन आणि वारा याचा अनुभव नसतो.

या ही परिस्थितीत जाधव यांच्यासह आशिष जोशी, किरीट कोकजे, अजित कुलकर्णी, डॉ. ओंकार थोपटे आणि फुरसुंगी येथील डॉ. चंद्रकांत हरपळे यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण केली. वयाच्या 65 व्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण करणारे जाधव हे भारतातील पहिलेच स्पर्धक आहेत. नुकतेच ते रेस क्रॉस अमेरिका या स्पर्धेसाठीसुद्धा पात्र ठरले आहेत. आतापर्यंत त्यांनी 6 वेळा आयर्नमॅन हा किताब मिळविला आहे. दररोज पहाटे 3 ते 7 असा 4 तासांचा पोहणे, धावणे, सायकल चालवणे असा दिनक्रम त्यांचा असतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे त्यांच्या यशाचे गमक आहे. अनेक खेळाडूंना ते मदत करत असतात. हडपसर फिटनेस हब म्हणून उदयास येत आहे, त्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news