येरवडा : सहायक पालिका आयुक्तांच्या कार्यालयात फेकला कचरा | पुढारी

येरवडा : सहायक पालिका आयुक्तांच्या कार्यालयात फेकला कचरा

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: येरवडा परिसरातील कचरा उचलला जात नसल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह शिवसैनिकांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त यांच्या टेबलवरच कचरा फेकत आंदोलन केले. आंदोलनानंतर बैठक घेत येरवडा येथील कचरा नियमित उचलला जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. येरवडा परिसरात गेल्या आठ दिवसांपासून कचर्‍याची समस्या गंभीर बनली आहे.

ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले असून पावसामुळे कचर्‍यातून उग्र वास येत आहे. त्यामुळे साथीचे आजार वाढले आहेत. आरोग्य निरीक्षकांना वारंवार सांगूनदेखील कचरा उचलला जात नसल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोसले, जाणू आखाडे यांच्यासह शिवसैनिकांनी येरवड्यातील कचरा तीन ते चार गोणीत भरून येरवडा क्षेत्रीय कार्यालयात आणला. त्यानंतर सहायक महापालिका आयुक्त वैभव कडलख यांच्या टेबलवरच कचरा फेकून निषेध केला.

येरवडा प्रभागात कचरा साचून राहिल्याने नागरिकांनी हा प्रकार केला. नादुरुस्त असलेल्या कचरा गाड्या, कचरा डेपोची परिस्थिती आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आली. यापुढे कचरा समस्या राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

                                  – वैभव कडलख, सहायक आयुक्त, पुणे महापालिका

Back to top button