सिग्नल बंद… कोंडी सुरू! गंगाधाम चौकातील नेहमीच्या प्रकाराने नागरिक त्रस्त | पुढारी

सिग्नल बंद... कोंडी सुरू! गंगाधाम चौकातील नेहमीच्या प्रकाराने नागरिक त्रस्त

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा: गुलटेकडी येथील गंगाधाम चौकातील सिग्नल यंत्रणा सकाळच्या सुमारास बंद पडल्याने गुरुवारी (दि. 18) परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाचा कर्मचारीही नसल्याने वाहनचालक, पादचारी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना बराच वेळ कोंडीत अडकून राहावे लागले. हा प्रकार या ठिकाणी नेहमीच पाहायला मिळतो.
गुरुवारी सकाळी नऊ ते अकराच्या सुमारास विद्युत पुरवठा नसल्याने सिग्नल बंद होते.

परिणामी मार्केट यार्ड परिसरातून कोंढवा, कात्रज, गोकूळनगर, सासवड, अप्पर डेपो, बिबवेवाडी आदी भागात जाण्यासाठी प्रमुख रस्ता असलेल्या या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुचाकी, चारचाकीखेरीज अवजड वाहनांचीही त्यात भर पडली. अखेर वाहतूक पोलिसांच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली. गुलटेकडी परिसरातील महत्त्वाचा चौक असलेल्या या चौकात कायमच्या वाहतूक कोंडीने परिसरातील व्यापारी, दुकानदार व रहिवासी त्रस्त झाले आहेत.

बंदीत अवजड वाहनांची वर्दळ
शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी असतानासुद्धा गंगाधाम चौकात सर्रासपणे मोठमोठे डंपर, वाळू वाहतूक करणार्‍या मोठ्या गाड्या तसेच पाण्याचे ट्रॅक्टर व राडाराडा उचलणारे मोठमोठे दहा चाकी डंपर आदी वाहनांची या भागात कायम वर्दळ असते. आई माता मंदिर ते गंगाधाम चौकदरम्यान तीव्र उतार असल्याने अनेक वेळा या ठिकाणी गाड्या बंद पडून तसेच ब्रेक निकामी होऊन अपघातही झालेले आहेत. मुळात या वाहनांना बंदी असताना कोणाच्या आशीर्वादाने या गाड्या इकडे धावतात याकडे लक्ष देण्याची आवश्यकता पोलिस व महापालिका प्रशासनाला वाटत नाही.

गंगाधाम चौकातील वाहतुकीवर स्थानिक पोलिस व वाहतूक शाखेचे नियंत्रण नाही. अवजड वाहने, अनियंत्रित वाहने, अनियंत्रित पार्किंग यामुळे व्यापार्‍यांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. सततच्या वाहतुकीच्या कोंडीने येथील प्रत्येकाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
– सुरेश अग्रवाल, स्थानिक व्यापारी, मार्केट यार्ड

गुरुवारमुळे अनेक ठिकाणी चौकातील सिग्नलचा विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात चौकामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. कोंडीच्या माहितीनंतर त्वरित कर्मचारी पाठवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर यापुढे परिसरात अवैध व चुकीची वाहने पार्किंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
– ए. बी. शेवाळे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, स्वारगेट विभाग

 

Back to top button