

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहने पार्क करण्याची समस्या वाढली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन कसरत करीत आहे. त्यावर तोडगा काढून तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी (दि.18) संबंधित अधिकारी व खासगी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. शहरातील हाऊसिंग सोसायट्यांच्या पार्किंगचा वापर करण्याचा पालिकेचा विचार आहे. पार्किंग संदर्भातील बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, सहायक नगररचना उपसंचालक प्रशांत शिंपी, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, पोलिस निरीक्षक सुनील पिंजण, विजया कारंडे, प्रसाद गोकुळे, दीपक साळुंखे यांच्यासह अर्बन वर्क्स, सेप्ट युनिवर्सिटी, अर्बन लॅब संस्थांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
शहराची लोकसंख्या 27 लाखांवर पोहचली आहे. सन 2041 मध्ये लोकसंख्येपेक्षा शहरात वाहनांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पार्किंगचा विचार केला तर भयावह चित्र निर्माण होणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. त्यासाठी पालिकेसह वाहतूक पोलिस, पीएमपीएल, मेट्रो, रेल्वे, आरटीओ या विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त वाघ म्हणाले की, पार्किंगसाठी शहरातील हाऊसिंग सोसायटीतील पार्किंगचा वापर करण्याचा विचार आहे. विकास आराखडा तयार करताना पार्किंगसाठी जागा आरक्षित ठेवली जात आहे.
कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यात येत आहे. शहरात 5 हजार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका व पोलिस असे दोन कंट्रोल रूम निर्माण करण्यात येणार आहेत.
पार्किंगवर मार्ग काढणे गरजेचे
शहरातील भविष्यात उद्भवणार्या पार्किंग समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करून दळणवळण सुव्यवस्थित करण्यासाठी नियोजन करावे. दळणवळण विषयक व्यवस्थापन करणार्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने पार्किंग समस्येवर दीर्घकालीन मार्ग शोधावा. त्यामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविता येईल, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.