गरीब रुग्णांना मिळेनात उपचार; पुणे जिल्ह्यात 2000 राखीव खाटा असूनही दाखवला जातो बाहेरचा रस्ता | पुढारी

गरीब रुग्णांना मिळेनात उपचार; पुणे जिल्ह्यात 2000 राखीव खाटा असूनही दाखवला जातो बाहेरचा रस्ता

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यात 64 धर्मादाय रुग्णालये असून, निराधार आणि निर्धन रुग्णांसाठी 1022 खाटा राखीव आहेत. गरीब आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी अल्प दरात 963 राखीव खाटा आहेत. मात्र, बहुतांश रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. अशा परिस्थितीत धर्मादाय आयुक्तालयाकडे तक्रार करता येऊ शकते, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
गरीब-निर्धन रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरणारी योजना 1 सप्टेंबर 2006 पासून लागू करण्यात आली. त्यानुसार वेबसाइटवर एकूण राखीव खाटांपैकी किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती प्रत्येक ट्रस्टअंतर्गत येणार्‍या हॉस्पिटलने देणे आवश्यक आहे.

मात्र, बहुतांश हॉस्पिटल याबाबत उदासीन आहेत. एकूण खाटांची संख्या वेबसाईटवर दिसत असली तरीही त्यातील किती खाटा शिल्लक आहेत याची माहिती अद्ययावत केली जात नाही. राज्यातील तब्बल 476 ‘ट्रस्ट हॉस्पिटल’मध्ये निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी 10 हजारांहून अधिक खाटा राखीव असून त्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी केवळ रेशनकार्ड किंवा दारिद्रयरेषेचे कार्ड किंवा वार्षिक उत्पन्नाचे तहसीलदाराचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

www.charity.maharashtra.gov.in/mr-in/ या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध असते. प्रत्येक जिल्ह्यानुसार तिथल्या ट्रस्ट हॉस्पिटलची यादी आणि तिथं उपलब्ध असणार्‍या खाटांची संख्या पाहता येते.

कशी मिळेल माहिती?
वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर मुखपृष्ठाच्या उजव्या कोप-यात साईटमॅपवर क्लिक करावे. त्यानंतरच्या पानावर ‘धर्मादाय रुग्णालये’ इथे क्लिक करावे. त्यात महाराष्ट्राचा नकाशा येईल, त्यापैकी आपला जिल्हा क्लिक केल्यास रुग्णालयाची यादी दिसेल.

निर्धन आणि दुर्बल घटकातील
रुग्णांसाठी निकष : निर्धन रुग्ण
उत्पन्न मर्यादा – वार्षिक 85 हजार रुपये
पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचार
10 टक्के राखीव जागा दुर्बल घटकातील/गरीब रुग्ण
उत्पन्न मर्यादा – वार्षिक 1 लाख 80 हजार रुपये
सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार (50 टक्के सवलत)
10 टक्के राखीव जागा

Back to top button