तळेगाव ढमढेरेत भाईगिरीची भुरळ; औद्योगिक वसाहतीमुळे झटपट श्रीमंतीची स्वप्ने | पुढारी

तळेगाव ढमढेरेत भाईगिरीची भुरळ; औद्योगिक वसाहतीमुळे झटपट श्रीमंतीची स्वप्ने

जालिंदर आदक

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) परिसरात तरुणांमध्ये भाईगिरीचे प्रमाण वाढत असून, वेळीच आवर घालण्याची गरज आहे. या परिसरात लागूनच औद्योगिक वसाहत असल्याने झटपट श्रीमंतीची स्वप्ने अनेकांना पडत आहेत. याच माध्यमातून तरुणवर्गात गुन्हेगारी जोरात वाढत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तरुणांमध्ये पोलिस खात्याची भीती उरली नाही, त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. पालकांचे दुर्लक्ष होत आहे आणि बाहेरील वातावरणात पोलिसांच्या कारवाया थंडावल्यामुळे कायद्याची भीतीच उरली नाही. तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन आयपीएस अधिकारी बनण्याची स्वप्ने उरी बाळगण्याची गरज आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाचा वापर करून उद्योग व्यवसायात भरारी घेतली पाहिजे. याकडे दुर्लक्ष करून भरकटलेले तरुण फालतू ग्रुप आणि वाईट संगतीने वाया गेले आहेत. अल्पवयीन तरुणांना भाईगिरीचे आकर्षण वाढले आहे. भाईगिरी चित्रपटाच्या पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रुप बनवून त्या सदस्यांचा जंगी वाढदिवस साजरा करणे, कोणत्या न कोणत्या मार्गे ग्रुपमध्ये सामील करून मोठे स्वरूप प्राप्त करायचे अशा विविध प्रकाराने तरुण भाईगिरीने डोके वर काढले आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर परिणामाची तमा न करता बिनधास्तपणे बिघडलेला तरुण काहीही करण्यासाठी तयार असतो. या भागातील व्यसनाधीन झालेला तरुण दिशाहीन झालेले चित्र निर्माण झाले आहे.

 

Back to top button