कामशेत उड्डाणपूल देतोय अपघाताला निमंत्रण

कामशेत उड्डाणपूल देतोय अपघाताला निमंत्रण

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : कामशेत येथील पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाची पावसामुळे दुरवस्था झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. हा उड्डाणपूल वाहनचालकांसाठी अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे; मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत परिसरात वाहतूक कोंडी होवू नये; तसेच कामशेत परिसरातील ग्रामस्थांना महामार्ग ओलांडणे धोक्याचे ठरू नये म्हणून कामशेत चौकात महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला. या उड्डाणपुलाचे बांधकाम सुमारे पाच वर्षे रखडले होते.

गेल्या वर्षभरापूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्यात आले व हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला; मात्र वर्षभरातच या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलावर अनेक ठिकाणी पावसामुळे खड्डे पडले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या पुलावरून जाणार्‍या दुचाकीस्वारांना खड्डे चुकविताना अपघातास सामोरे जावे लागत आहे. पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर मोठे खड्डे पडल्याने वेगाने आलेल्या वाहनांवर अचानक खड्डे दिसल्याने नियंत्रण मिळविणे अवघड जाते. प्रसंगी वाहनांचे अपघात होत आहेत.

उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांना छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागले आहे. काही अपघातामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. तरीसुद्धा संबंधित प्रशासनाला जाग आली नाही. पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, या संदर्भात अनेक ग्रामस्थांनी तक्रारी करूनही अद्यापपर्यंत कसलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे कामशेत परिसरातील वाहनचालकांतून तसेच ग्रामस्थांतून नाराही व्यक्त केली जात आहे.

उड्डाणपूल तयार करताना निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्याने वर्षभरातच त्याची दुरवस्था झाली असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. पावसाळा सुरु झाल्यापासून पुलावर खड्डे पडले आहेत. अजून किती अपघात होण्याची वाट रस्ते प्रशासन पाहत आहे, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर तीव्र उतार असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे अनेक वाहन चालक अचानक खड्डे दिसल्याने वाहनांना ब्रेक मारत असल्याने मागील वाहने आदळून अपघात होत आहेत. त्यामुळे अनेकांच्या वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावरील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ तसेच वाहन चालकांतून केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news