राजमाता जिजाऊनगरजवळील नाल्याची दुरवस्था.
राजमाता जिजाऊनगरजवळील नाल्याची दुरवस्था.

पौड रोड : साथीच्या आजारांत वाढ; परिसरात डबकी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला

पौड रोड; पुढारी वृत्तसेवा: पौड रोड परिसरात नाले तुंबल्याने अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. या साचलेल्या पाण्यामुळे डास, चिलटांचा प्रादुर्भाव वाढून परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियांसारख्या साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील राजमाता जिजाऊनगर, शिवतीर्थनगर जवळ, कोथरूड डेपो, उजवी भुसारी कॉलनी भागातील या परिस्थितीबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

या पौड रस्ता परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. तसेच या भागात अनेक ठिकाणी लहान-मोठी बांधकामे, तसेच जुन्या सोसायट्यांच्या रिनोव्हेशनची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे, राडारोडा, तसेच पाणी साचून राहतील, अशा बांधकामादरम्यानच्या टाकाऊ वस्तू जागोजागी पडून असल्याचेही दिसून येत आहे. साहजिकच तुंबलेल्या नाल्याबरोबरच अशा ठिकाणी साचून राहणार्‍या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना थंडीतापासह सर्दी, खोकला, अंगदुखी अशा अनेक त्रासांना नागरिकांना सामोरे जावे
लागत आहे.

याबाबत बोलताना स्थानिक रहिवासी असलेल्या दीपाली डोख म्हणाल्या, 'परिसरातील अनेक भागांतील पावसाळी वाहिन्या, ड्रेनेज वाहिन्या कुचकामी ठरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामध्ये डासांची उत्पत्ती वाढून अनेक नागरिक आजारी पडत आहेत. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन औषध फवारणी त्वरित करावी.'

दररोज 60 ते 70 रुग्ण दाखल
पौड रस्ता परिसरातील केळवाडी भागात महापालिकेचे सुंदराबाई राऊत दवाखाना हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात थंडीताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी दुखणी असलेले दररोज सुमारे 60 ते 70 रुग्ण येत आहेत. अशा रुग्णांपैकी प्लेटलेट्स कमी आढळून आलेल्या रुग्णांना कमला नेहरू रुग्णालयात पाठवले जात आहे, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला देशमुख यांनी सांगितले.

नागरिकांनो, हे कराच!
एखाद्या ठिकाणी किमान चार- पाच दिवस पाणी साचून राहिले असेल, तर तिथे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे परिसरात पाणी साचून राहणार्‍या वस्तू, कचरा त्वरित साफ होईल याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच भंगार वस्तू छपरावर ठेवू नयेत. शोभिवंत झाडांच्या कुंड्यांमधील पाणी नियमित बदलावे. फ्रीजच्या ट्रे मधील पाणी काढायला हवे.

logo
Pudhari News
pudhari.news