पुणे : युवावर्ग विजयपताका फडकवेल : राज्यपाल | पुढारी

पुणे : युवावर्ग विजयपताका फडकवेल : राज्यपाल

पुणे : ‘देशातील युवावर्ग विज्ञान, शिक्षण, वाणिज्य, उद्योग, आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रांत आपली विजयपताका फडकवेल,’ असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या युवा संकल्प अभियानाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होेेते. युवा संकल्प अभियान तसेच या अभियानांतर्गत राष्ट्रध्वजासोबत छायाचित्रांचा संग्रह अपलोड करण्याच्या गिनीज विश्वविक्रमाची घोषणा कोश्यारी यांच्या उपस्थितीत विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडासंकुलात करण्यात आली.
कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयोजन समिती अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

तिरंगासोबत छायाचित्रांचा विश्वविक्रम
कुलगुरू म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा ध्वजासोबत छायाचित्रे अपलोड करण्याचा हा विश्वविक्रम युवकांच्या सहभागाने यशस्वी होऊ शकला. मागील दोन वर्षांत हा दुसरा विश्वविक्रम आहे. विद्यापीठ शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबत सामाजिक जाणिवेतूनही अनेक उपक्रम राबवत असते.’

अग्निशमन दलातील अधिकार्‍यांचा सन्मान
कर्तव्य फाउंडेशनतर्फे पुणे कँटोन्मेंट बोर्ड, लष्कर पोलिस ठाणे, पुणे मुख्य टपाल कार्यालय, कँटोन्मेंट अग्निशमन केंद्रातील अधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रतो पाल, पोलिस अधिकारी अशोक कदम, पुणे हेड पोस्ट ऑफिसचे सीनिअर पोस्ट मास्तर आर. डी. कुलकर्णी व कँटोन्मेंट अग्निशमन दलाचे अधीक्षक रोहित रणपिसे यांच्याकडे सन्मानचिन्ह सुपूर्त करण्यात आले. या वेळेस विकास भांबुरे, अशोक देशमुख, मोहसीन शेख, दिलीप भिकुले उपस्थित होते.

देशभक्तीपर गाणी अन् चिमुकल्यांचे नृत्य
आंबेगाव संकुलातील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. राजीव जगताप, सुनीता जगताप, दीपिका जगताप आदी उपस्थित होते. या वेळी संगीत विभागाच्या काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली, तर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर केले. विनोदकुमार बंगाळे यांनी प्रास्ताविक केले.

Back to top button