पिंपरी : बनावट दस्त करून 92 लाखांचा अपहार | पुढारी

पिंपरी : बनावट दस्त करून 92 लाखांचा अपहार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कंपनीच्या मालकाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून खोटा दस्तऐवज सादर करीत कंपनीतून 92 लाख 98 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. ही घटना सन 2013 ते सन 2021 या कालावाधीत फाल्कोईमोटर्स प्रा. लि. मोरवाडी, पिंपरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राकेश किंमतीलाल धवन उर्फ राकेशकुमार धवन (वय 54, रा. अमेरिका), दीपक अंकुश क्षीरसागर (वय 37, रा.चिखली) यांनी, महिला फिर्यादी या भारतात नसताना त्यांनी कंपनीचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आरोपींना अधिकार दिले होते.

या अधिकारांचा गैरवापर करून फाल्कोई मोटर्स प्रा. लि. कंपनीच्या 2016, 2017 व 2018 च्या बोर्ड मिटींगमध्ये फिर्यादी या हजर असल्याचे दाखवून आरोपी दीपक क्षीरसागर याने फिर्यादीची खोटी सही केली. या खोट्या सहीद्वारे आरोपीने स्वत:ला फिर्यादींचा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याचे दाखवले. तसेच कंपनीच्या 2015 ते 2018 च्या ऑडिट रिपोर्ट, बॅलन्सशीट, प्रॉफीट अँण्ड लॉस स्टेटमेंन्ट आदी कागदपत्रांवर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या केल्या. ही सर्व कागदपत्रे आरोपीने सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करून त्याचा वापर कंपनीच्या कायदेशीर कामासाठी केला.

तसेच आरोपींनी संगनमत करत खोटे दस्तऐवज तयार करून 92 लाख 98 हजार 900 रुपयांचा अपहार केला आहे. या विरोधात फिर्यादीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर कलम 406, 467, 468, 471 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

Back to top button