पिंपरी : सांस्कृतिक कार्यक्रमांवर कोणतेही निर्बंध नसल्याने दहीहंडीने निवेदकांना सुगीचे दिवस | पुढारी

पिंपरी : सांस्कृतिक कार्यक्रमांवर कोणतेही निर्बंध नसल्याने दहीहंडीने निवेदकांना सुगीचे दिवस

वर्षा कांबळे: 

पिंपरी : गेली दोन वर्षे कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यावर बंदी होती. त्यामुळे कलाकारांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता. बहुतांश कलाकारांचे उत्पन्न बंद झाले होते. मात्र, यंदा सणानिमित्त होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांवर कोणतेही निर्बंध नसल्याने कलाकारांना सुगीचे दिवस आले आहेत. येणार्‍या दहीहंडी उत्सवामध्ये देखील निवेदक, बाऊन्सर, नृत्य व गायक यांना सुगीचे दिवस आले आहेत. सणानिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे अनेक छोट्या आणि मोठ्या कलाकारांचे उत्पन्नाचे साधन असते. कोरोनाकाळात या उत्पन्नावरच गदा आली होती. त्यामुळे कलाकरांना पर्यायी व्यवसायाचा आधार घ्यावा लागला. शहरामध्ये आणि सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. यंदा राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या लाखोंच्या दहीहंडी फुटणार आहेत. त्याची जय्यत तयारी शहरात सुरू आहे. लोकांची गर्दी खेचून आणण्यासाठी शहरात मोठेमोठे सेलिब्रिटी बोलावले जातात.

निवेदकांना मागणी
कोणत्याही कार्यक्रमात प्रेक्षकांना नियंत्रण आणण्यासाठी आणि खिळवून ठेवण्याचे काम करतो तो निवेदक. यंदा दहीहंडीच्या निमित्ताने शहरातील निवेदकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निवेदकांच्या तारखा देखील फूल झाल्या आहेत. तसेच यानिमित्त निवेदकांची चांगली कमाई देखील होत आहे.

सुरक्षेसाठी बाऊन्सर दहीहंडीसाठी जे सेलिब्रिटी बोलावले जातात त्यांच्या सुरक्षेसाठी महिला व पुरूष बाऊन्सर यांना मागणी असते. प्रेक्षकांच्या गर्दीतून स्टेजपर्यंत सुरक्षित नेण्यासाठी बाऊंसरची आवश्यकता असते. कारण बर्‍याचदा प्रेक्षकांकडून गैरवर्तन होण्याची शक्यता असते. म्हणून सेलिब्रिटीच्या सुरक्षेसाठी बाऊन्सरचा कडेकोट बंदोबस्त असतो. यंदा बाऊन्सर्सना मागणी वाढली आहे.

ऑर्केस्ट्राला डिमांड
दहीहंडी कार्यक्रमाला सायंकाळी पाच वाजता सुरुवात होते ते रात्री दहा वाजल्यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. तोपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी गायक आणि नृत्य कलाकार हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. यासाठी ऑर्केस्ट्रा बोलावले जात आहेत. दहीहंडीनिमित्त ऑर्केस्ट्राला डिमांड आली आहे.

दहीहंडीच्या निमित्ताने खूप सार्‍या ठिकाणाहून निवेदनासाठी मागणी येत आहे. यावर्षी राजकीय नेत्याकडून खूप डिमांड वाढली आहे. दोन वर्ष कोरोनामुळे कलाकार घरी बसले होते. आता कलाकारांना उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध झाला आहे.
                                                                 -अक्षय घोळवे, (आर.जे. व अँकर)

Back to top button