गणेशोत्सवासाठी पुणे पोलिस सज्ज: आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती | पुढारी

गणेशोत्सवासाठी पुणे पोलिस सज्ज: आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांनंतर गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात होणार असल्याने लोकांमध्ये खूप उत्साह आहे. पोलिसांच्या गणेशोत्सवासंदर्भात अनेक बैठका झाल्या असून, पुणे पोलिस गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. ‘आम्ही लोकांना सर्वोतोपरी मदत पुरविणार आहोत. कोणतीही अडचण असेल, त्याबाबत आमची तयारी सुरू आहे. वाहतूक, कायदा आणि सुव्यवस्था, महिला सुरक्षितता, यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत,’ अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी (दि.18) दिली. ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’द्वारे नूतनीकरण केलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन व संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गुप्ता म्हणाले, ‘आमच्याकडे गणेश मंडळांनी मांडव उभारणीच्या परवानगीसाठी विचारणा केली आहे. आम्ही परवानगी देत आहोत. जे पाच वर्षांच्या परवानगीसाठी येत आहेत त्यांनाही आम्ही परवानगी देत आहोत. ढोल-ताशा पथकांबद्दल तक्रारी सुरू आहेत. एक समतोल आपल्याला करावा लागतो. ढोल-ताशा पथकांनाही सराव हवा आहे आणि लोकांनाही आवाज नको आहे. त्यामुळे ढोल-ताशा पथकांवर सरावाच्या वेळेसाठी काही बंधने टाकली आहेत. एक ते दीड तास त्यांना सरावासाठी परवानगी दिली असून, शक्यतो त्यांना मैदानावर सराव करण्यास सांगत आहोत. गणेशोत्सव जवळ आला की त्यावर पुनर्विचार करू. शिस्त आणि समतोलासाठी पुणे पोलीस काम करणार आहेत.’

Back to top button