पिंपरी : ई-संजीवनी योजनेचा सव्वा लाख जणांनी घेतला लाभ | पुढारी

पिंपरी : ई-संजीवनी योजनेचा सव्वा लाख जणांनी घेतला लाभ

दीपेश सुराणा : 

पिंपरी : केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी योजनेचा पुणे जिल्ह्यातील 1 लाख 24 हजार जणांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. गेल्या अडीच वर्षांतील ही परिस्थिती आहे. या सेवेअंतर्गत 72 डॉक्टर रुग्णांना व्हिडीओ कॉलद्वारे मोफत वैद्यकीय सल्ला देत आहेत. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सुविधा मिळावी, या उद्देशाने ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी ही सेवा 1 जानेवारी 2020 पासून सुरू करण्यात आली. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ही योजना बंद न ठेवता सुरूच ठेवण्यात आली आहे.

योजनेतंर्गत व्हिडीओ कॉलद्वारे डॉक्टर रुग्णांशी संवाद साधतात. हाडाचे विकार, शस्त्रक्रिया, दंतोपचार, मानसोपचार, स्त्रीरोग, असे सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांना ऑनलाइन सल्ले उपलब्ध होतात. त्याशिवाय होमियोपॅथी, आयुर्वेदिक, युनानी आदी उपचार पद्धतींवर आधारितही वैद्यकीय सल्ला दिला जातो. पुणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी एकूण 72 डॉक्टर सेवा देत आहेत. या सेवेत रुग्णांना फोनवर किंवा लॅपटॉप/संगणकाच्या मदतीने देखील ऑनलाइन सल्ला मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 1 लाख रुग्णांना डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तर, 1 एप्रिलपासून 16 ऑगस्टपर्यंत 24 हजार रुग्णांना ऑनलाइन सल्ला देण्यात आला आहे. ही ऑनलाइन ओपीडी रविवारी देखील सुरू असते. सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी त्याची वेळ आहे. दुपारी 1 ते 1:45 दरम्यान जेवणाची सुट्टी असते. त्यामुळे त्या वेळेत सेवा बंद असते. रुग्णांना मिळणार्‍या ई-प्रिस्क्रिप्शनद्वारे ते सरकारी रुग्णालयात किंवा औषधाच्या दुकानात जाऊनही औषधे घेऊ शकतात.

कशी चालते यंत्रणा
मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून ई-संजीवनी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर रुग्णाला नोंदणी करावी लागते. त्यानंतर टोकन क्रमांक मिळतो. तसेच, मोबाईलवर नोटिफिकेशन मिळाल्यानंतर लॉगिन करावे लागते. त्यानंतर वेटिंग रूममध्ये प्रवेश होतो. थोड्या वेळाने कॉल नाऊ हे बटन सुरू होते. व्हिडीओ कॉल केल्यावर डॉक्टर दिसू लागतात. त्यांचा वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर लगेचच ई-प्रिस्क्रिप्शन मिळते. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरद्वारे या सेवेचा लाभ घेण्यासाठी https://esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागते. वेबकॅमेरा कनेक्ट करावा लागतो. तसेच, इंटरनेटची सुविधा असावी लागते.

जिल्हा रुग्णालयाचे नियंत्रण
पुणे जिल्ह्यातील ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी सेवेवर नियंत्रण ठेवण्याचे काम सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालयामार्फत केले जात आहे. डॉक्टर उपलब्ध आहे की नाही, तसेच अन्य बाबींची पूर्तता होत आहे का, याची चाचपणी रुग्णालय प्रशासनामार्फत केली जाते.
शासनाची ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी सेवा या योजनेद्वारे रुग्णांना ऑनलाइन घरबसल्या वैद्यकीय सल्ला मिळतो. जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यायला हवा. ही सेवा मोफत उपलब्ध आहे.
                                          – डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक

Back to top button