पुणे : प्रत्यारोपण समितीसमोर पाच अर्ज; एका प्रकरणाच्या कागदपत्रांबाबत साशंकता | पुढारी

पुणे : प्रत्यारोपण समितीसमोर पाच अर्ज; एका प्रकरणाच्या कागदपत्रांबाबत साशंकता

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नवीन विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीच्या बैठकीत अतिशय सतर्कता, सावधगिरी बाळगली जात आहे. सध्या समितीसमोर मंजुरीसाठी पाच प्रकरणे आली आहेत. त्यापैकी दोन अर्जांना मान्यता देण्यात आली असून, एका प्रकरणाच्या कागदपत्रांबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित दोन प्रकरणांसाठी गुरुवारी (दि. 18) बैठक होणार आहे. पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. किडनी प्रत्यारोपण प्रकरणामध्ये नातेसंबंध तपासून त्यांना मान्यता देण्यासाठी ससूनमधील अवयव प्रत्यारोपण समिती जून महिन्यात पुनर्गठित करण्यात आली आहे.

समितीकडे पाच अर्ज पडताळणीसाठी आले आहेत. कागदपत्रांची बारकाईने छाननी करूनच मान्यता द्यायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जात आहे. दोन अर्जांसोबत असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून मान्यता देण्यात आली. दोन्ही रुग्ण भारताबाहेरील असून शस्त्रक्रिया पुण्यात होणार आहे. एका अर्जाबाबत साशंकता निर्माण झाल्याने त्याची पडताळणी करण्यात येत आहे. तो अर्ज पुनरावलोकनसाठी (रिव्ह्यू) पाठवण्यात आला. उर्वरित दोन अर्जांबाबत गुरुवारच्या बैठकीत चर्चा होईल.

एक अर्ज ‘रिव्ह्यू’साठी
कोल्हापूरच्या एका अर्जाबाबत साशंकता निर्माण झाल्याने अर्ज पुन्हा ‘रिव्ह्यू’साठी पाठवण्यात आला आहे. यामध्ये सासूकडून जावयाला किडनी दान केली जाणार आहे. या प्रकरणात सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे अलीकडच्या तारखांची आहेत. मात्र, जेनोटायपिंग जुळत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरीही, फोटो आणि प्रत्यक्ष व्यक्ती यांच्यात तफावत आढळून आल्याने कागदपत्रे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आली आहे.

प्रत्यारोपण समितीतर्फे कागदपत्रांची पडताळणी करताना दाता आणि रुग्ण यांच्यातील नातेसंबंध बारकाईने तपासले जात आहेत. आवश्यकता वाटल्यास नाते सिद्ध करणारे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले जात आहे.

                 – डॉ. भारती दासवानी, वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय

Back to top button