पुणे : ‘पुण्यदशम्’ ठेकेदारांच्या ताब्यात; मनुष्यबळ असतानाही कंत्राटदारांच्या फायद्यासाठी निर्णय | पुढारी

पुणे : ‘पुण्यदशम्’ ठेकेदारांच्या ताब्यात; मनुष्यबळ असतानाही कंत्राटदारांच्या फायद्यासाठी निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पीएमपीने ताफ्यातील स्व:मालकीच्या ‘पुण्यदशम्’ बसगाड्या देखभाल दुरुस्तीसाठी आता प्रतिकिलोमीटर पैसे देऊन ठेकेदाराला दिल्या आहेत. पीएमपी प्रशासनाकडे देखभाल दुरुस्तीसाठी मनुष्यबळ नाही का, असा सवाल पीएमपी प्रवासी मंचकडून करण्यात आला आहे. पीएमपीकडे बसच्या देखभाल दुरुस्तीसाठी कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत दिवस व रात्रपाळीला साधारण एक हजार कामगार काम करतात. वर्षभर या बसची देखभाल दुरुस्ती ही पीएमपीच्या कार्यशाळेत करण्यात आली. मनुष्यबळ व कार्यशाळा असताना देखील ‘पुण्यदशम्’ बस देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदाराला प्रतिकिलोमीटर पैसे देत एक प्रकारे ‘पुण्यदशम्’ बस ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रवासी मंचच्या वतीने करण्यात आला.

वर्षभराची वाटचाल
महापालिकेने पीएमपीला 2021 मध्ये ‘पुण्यदशम्’च्या 50 बस दिल्या होत्या. त्यानुसार नऊ जुलैपासून ‘पुण्यदशम्’ ही बससेवा सुरू केली होती. शहरातील नऊ मार्गावर बस सुरू आहेत. गेल्या वर्षभरात ‘पुण्यदशम्’मधून 1 कोटी 35 लाख, 29 हजार 090 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामधून पीएमपीला 6 कोटी 67 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षात ‘पुण्यदशम्’ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, दहा रुपयांत दिवसभर प्रवास असल्यामुळे प्रवाशांचीसुद्धा मोठी बचत होत आहे.

ठेकेदारासोबत सहा वर्षांचा करार…
‘पुण्यदशम्’च्या 50 बसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदारासोबत सहा वर्षांचा करार करण्यात आला आहे. त्यासाठी ठेकेदाराला प्रतिकिलोमीटर सात ते आठ रुपये दिले जाणार आहेत. साधारण दिवसाला 140 किलोमीटरचे पैसे ठेकेदाराला द्यावे लागणार आहेत.‘पुण्यदशम्’च्या बस वेगळ्या कंपनीच्या असल्यामुळे त्याच्या स्पेअरपार्टची (इनव्हेंटरी) वेगळी नोंद ठेवावी लागणार होती. या बसचा वॉरन्टी संपल्यानंतर या बस 9 जुलै 2022 पासून ठेकेदारांना देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पीएमपीच्या अधिकार्‍यांनी दिली.

पीएमपी प्रशासन कायमच खासगी ठेकेदारांच्या बाजूने असलेले दिसते. स्वत:कडे देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचारी असतानाही पीएमपीने ठेकेदाराला या गाड्या मेंटेनन्ससाठी देणे चुकीचे आहे. ठेकेदाराला बस देऊन पीएमपीने ‘पुण्यदशम्’ बस ठेकेदाराच्या घशात घालण्याचा डाव रचला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे

                                                     – जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच

पीएमपीकडे असलेल्या 50 ‘पुण्यदशम्’ बस आयसर कंपनीच्या आहेत. त्यांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च अधिक होता. ठेकेदाराकडून या बस देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी होणार आहे आणि ते पीएमपीला परवडणारे आहे. त्यामुळे या बस ठेकेदाराला देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आल्या आहेत.

           – लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Back to top button