राज्यातील 3,267 धरणांत 80 टक्के पाणीसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत 23 टक्के जादा | पुढारी

राज्यातील 3,267 धरणांत 80 टक्के पाणीसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत 23 टक्के जादा

शिवाजी शिंदे

पुणे : यंदा जुलै ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत अवघ्या दीड महिन्यात राज्यातील तब्बल 3 हजार 267 धरणे 80 टक्के भरली असून, गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 23 टक्क्यांनी अधिक आहे. अजून दीड महिना पाऊस शिल्लक असल्याने यंदा राज्यात उदंड जाहले पाणी, असे सुखद चित्र आहे. राज्यात मागील वर्षी सर्व धरणांत मिळून 57.58 टक्के इतके पाणी भरले होते. कारण, गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते.

मात्र, परतीचा पाऊस चांगला पडल्याने सर्व धरणे भरली. मात्र, यंदा सर्व धरणे ऑगस्टमध्येच भरल्याने सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस झाला, तर धरणांतून पाणी मोठ्या प्रमाणावर सोडावे लागणार आहे. राज्यात मोठे, मध्यम आणि लघू असे धरणांचे चार प्रकार आहेत. सहा विभागांतील सर्वच धरणांचा एकत्रित ताळेबंद मांडला असता बहुतांश धरणे 80 टक्के व त्यापेक्षा अधिक भरलेली आहेत.

यंदा भरलेल्या धरणांचा ताळेबंद
100 टक्के भरलेली धरणे – एकूण 17
कवडास (कोकण-पालघर), असोळामेंढा (विदर्भ-चंद्रपूर), दिना (गडचिरोली), इटियाडोह (गडचिरोली), मुकणे (नाशिक), भाम (नाशिक), वाघाड (नाशिक), तिसगाव (नाशिक), ओझरखेड (नाशिक), चासकमान (पुणे), भाटघर (पुणे), पानशेत (पुणे), वरसगाव (पुणे), खडकवासला (पुणे), उजनी (सोलापूर), बारवी, मुळशी-टाटा (घाटमाथा-पुणे).

51 ते 99 टक्के पाणीसाठा – एकूण 67 धरणे
10 ते 50 टक्के पाणीसाठा – एकूण 13 धरणे

राज्याच्या सहा विभागांतील धरणांचा पाणीसाठा (टक्केवारीत)
प्रदेश      आजचा साठा     मागील वर्षीचा साठा
अमरावती    79.41                     52.01
औरंगाबाद   69.67                     38.48
कोकण        90.23                     79.39
नागपूर         76.01                    43.08
नाशिक         75.1                      45.22
पुणे              85.17                    72.58
एकूण          79.71                      57.58

Back to top button