पुणे : चेंबरमध्ये पडलेल्या गाईला पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिले जीवदान | पुढारी

पुणे : चेंबरमध्ये पडलेल्या गाईला पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिले जीवदान

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील वीर सावरकर जलतरण तलावाजवळ एक गाय भूमीगत गटाराच्या उघड्या चेंबरमधून आतमध्ये पडली. बारामती नगरपरिषदेला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱयांनी मोठ्या कष्टाने ही गाई बाहेर काढत तिला जीवदान दिले.

बुधवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. वीर सावरकर जलतरण तलावाजवळच्या चेंबरमध्ये ही गाय पडली. या गाईला आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील कर्मचाऱयांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. सुरुवातीला गाईला कासरा बांधून वर काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु गाईचे वजन अधिक असल्याने ती बाहेर निघणे अशक्य झाले. त्यानंतर जेसीबी मशिनला पाचारण करण्यात आले.

साधारणतः १० ते १२ फूट खोल चेंबरमध्ये ही गाय अडकली होती. आरोग्य विभागाचा एक कर्मचारी धाडसाने चेंबरमध्ये उतरला. त्याने गायीच्या पाठीला दोन दोर बांधले. हा दोर जेसीबीच्या हुकाला अडकवत दुसरा दोर सोनवणे यांनी स्वतः धरून गाईला कोणतीही इजा न होता वर काढत जीवदान दिले.

Back to top button