पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसर्या फेरीतील प्रवेशांसाठी बुधवारी (17 ऑगस्ट) अंतिम मुदत आहे. दुसर्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जेमतेम 5 हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला असून, 18 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेतील तिसरी फेरी सुरू करण्यात येणार आहे. यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 8 हजार 830 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 85 हजार 240 जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत.
पहिल्या फेरीत 25 हजार 799 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर राखीव जागांद्वारे (कोटा) आतापर्यंत 6 हजार 677 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. प्रवेशप्रक्रियेच्या दुसर्या फेरीत 17 हजार 62 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. आत्तापर्यंत एकूण 37 हजार 665 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आता दुसर्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बुधवारी अंतिम मुदत आहे. दुसर्या फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेरीत सहभागी करून घेतले जाणार नाही. त्यामुळे प्रवेश जाहीर झालेल्या आणि प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी तातडीने प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.