शिवणे पुलाचे काँक्रीट गेले वाहून ! हजारो नागरिकांना धोकादायक पद्धतीने करावा लागतोय प्रवास | पुढारी

शिवणे पुलाचे काँक्रीट गेले वाहून ! हजारो नागरिकांना धोकादायक पद्धतीने करावा लागतोय प्रवास

खडकवासला/शिवणे : पुढारी वृत्तसेवा :  कोट्यवधी रुपये खर्च करून नदीवर शिवणे-नांदेड येथे उभारलेल्या पुलाचे काँक्रीट पुरात वाहून गेले आहे. त्यामुळे पुलावरून ये-जा करणार्‍या हजारो नागरिकांना धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे.
खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने येथून अतिरिक्त पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याकाळात पुलावरून पाणी वाहत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. त्यामुळे, तब्बल दीड कोटी रूपये शिवणेहुन नांदेड गावाला जोडणार्‍या जुन्या पुलावर काँक्रीटीकरण करून त्या पुलाशेजारी एक नवीन पूल बांधण्यात आला.

13 मार्च रोजी त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच या पुलावरील रस्त्याचे काँक्रीटीकरण पुराच्या पाण्यामुळे उखडले असून, रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा काही भाग वाहून गेला आहे. पुलाचे काँक्रीट वाहून गेल्याने पूल उद्ध्वस्त होऊन वाहतूक ठप्प पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नदीवरील हा पूल दर वर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणार असल्याची माहिती असतानादेखील ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम केले नसल्याने पुलाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे, पुलाचे काम करणार्‍या ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नीलेश वांजळे व स्थानिक कार्यकत्र्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी (दि. 16) परिसरात भेट देऊन पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या काँक्रीटीकरणाची पाहणी केली.

नवीन पुलाचे काम मुठा नदीच्या पात्रात करण्यात आले आहे. जुन्या पुलालगतच नवीन पूल आहे. काँक्रीटीकरण करताना मूळ डांबरीकरणाचे थर, तसेच होते. काँक्रीटीकरण करताना लोखंडी जाळ्या बसविल्या नाहीत. त्यामुळे पाण्याच्या लाटांनी काँक्रीटीकरण वाहून गेले. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी केली.
नवीन पूल सुरक्षित असून, जुन्या पुलाच्या काँक्रीटचा थर वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीला कोणताही धोका नाही. पुलाचे काँक्रीटीकरण पुन्हा करण्यात येणार आहे.
           – युवराज देसाई, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद

Back to top button