खुनाचा प्रयत्न करणारे चार जण गजाआड | पुढारी

खुनाचा प्रयत्न करणारे चार जण गजाआड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिगारेट आणि पाण्याच्या बाटलीच्या पैशातून झालेल्या वादातून टोळक्याने लोखंडी पाईप, लोखंडी कैचीने, तसेच दगडाने मारहाण करून एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चार जणांना अटक केली.
नौशाद जुबेर शेख (33), हुसेन जमाल खान (21), वसीम सय्यद (30), कासीम नबी शेख (19, सर्व रा. ताडीवाला रोड) अशी अटक झालेल्या सराईतांची नावे आहेत. याबाबत स्वप्नील दत्तू कांबळे (23, रा. ताडीवाला रोड) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 15 ऑगस्टच्या मध्यरात्री जहांगीर हॉस्पिटलसमोर, तसेच ताडीवाला रोडवरील सिद्धेश्वर चौकाजवळील परिसरात घडला.

यातील फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.संशयित आरोपी नौशाद शेखचे जहांगीर हॉस्पिटलसमोर मंजूर पान शॉप आहे, तर इतर तिघे तेथे कामास आहेत. स्वप्नील त्याच्या मित्रांसोबत सिगारेट, तसेच पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी सिगारेट आणि बाटलीच्या किमतीवरून आरोपींनी स्वप्नीलला शिवीगाळ करून मारहाण केली.

या वेळी स्वप्नीलच्या दुचाकीची चावी तेथे पडली. मात्र, दुचाकी बिगरचावीची सुरू करून स्वप्नील तेथून निघून गेला. मात्र, गाडीची चावी शोधण्यासाठी पहाटे सव्वादोनच्या सुमारास स्वप्नील त्याच्या मित्रांसोबत आला असता, त्याला शिवीगाळ करीत आरोपींनी लाकडी दांडक्याने, लोखंडी पाईपने, तसेच दगडाने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला. यासंबंधी गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

Back to top button