पोलिसांचे प्रश्न सोडवायला हवेत, आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘पोलिसांच्या हक्काचे निवास आणि कामांच्या तासांबाबतचा प्रलंबित मूलभूत प्रश्न सोडवायला हवेत, त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होऊ शकेल,’ असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. पोलिस मित्र संघटनेच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी बजाविणारे अधिकारी व कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
त्या प्रसंगी आमदार पवार बोलत होते. या वेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, माजी आमदार मोहन जोशी, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, डीजीपी एन. डी. पाटील, अॅड. हर्षद निंबाळकर, राजू पवार, चंद्रशेखर कपोते यांसह मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र काम करीत असतात. त्यांना सणवार, मान्यवरांचे दौरे यामुळे सतत कार्यतत्पर राहावे लागते. अशा वेळी त्यांच्या कुटुंबाला ते पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. पण, पोलिसही माणूसच आहेत. त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची आज आवश्यकता आहे.
पोलिसांकडे जशी आदराने बघण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे पोलिसांविषयी आदरयुक्त भीतीही आवश्यक आहे.’ राजेंद्र कपोते यांनी प्रास्ताविकात पोलिस मित्र संघटनेच्या स्थापनेची तसेच आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले. राजेंद्र बलई यांनी उपस्थितांचे आभार मानले.