पुणे : विसर्जनाला 150 फिरते, 136 स्थिर हौद ठेवणार | पुढारी

पुणे : विसर्जनाला 150 फिरते, 136 स्थिर हौद ठेवणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘आगामी गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून गणेश विसर्जनासाठी 150 फिरते हौद आणि शहरात 136 स्थिर विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे,’ अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. कोरोनानंतर दोन वर्षांनी पुण्यात मोठ्या उत्साहात यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर तयारी केली जात आहे. दर वर्षीप्रमाणे महापालिका विसर्जन घाट, स्थिर हौदांची आणि शहरात फिरते विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करणार आहे.

पालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या गावांमध्ये 23 फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात दीड दिवस, पाच, सात आणि दहा दिवसांचे गणेश विसर्जन केले जाते. त्यानुसार महापालिकेने विसर्जन तलावांच्या बांधकामाचे नियोजन केले आहे. यंदा घनकचरा विभागाकडून 150 फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेच्या पंधरा झोन कार्यालयांतून स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात येणार आहे.

याशिवाय शहरातही ठिकठिकाणी विसर्जन तलाव बांधण्यात येणार आहेत. यंदा शहरातील विविध भागांत 136 ठिकाणी विसर्जन तलाव बांधण्यात येणार आहेत. निश्चित केलेल्या टाक्यांची स्वच्छता, रंगरंगोटी, दिवाबत्ती या सगळ्यांसाठी खर्चाला मान्यता दिल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले

Back to top button