पुणे : बंद सदनिका चोरट्यांच्या रडारवर ; विविध भागांमध्ये चार घरफोड्या | पुढारी

पुणे : बंद सदनिका चोरट्यांच्या रडारवर ; विविध भागांमध्ये चार घरफोड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहराच्या वेगवेगळ्या भागात सोसायटीतील सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लांबविला. वारजे, महंमदवाडी, भेकराईनगर आणि औध भागांत या घटना घडल्या आहेत. याबाबत चिराग पवळे (वय 39, रा. वारजे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवळे वारजे गावठाणातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी पवळे यांच्या सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख 58 हजारांचे दागिने लांबिवले. सदनिकेत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

दुसर्‍या घटनेत अमर किसन खत्री (वय 35, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी) यांचे घर कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलूप तोडून, गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान केले. हा प्रकार 12 ऑगस्ट रोजी पावणेदहा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. हडपसरमधील भेकराईनगर परिसरात असलेल्या त्रिमूर्ती विहार सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख 47 हजारांचे दागिने लांबविले. याबाबत विशाल मोहिते (वय 39) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोहिते यांच्या सदनिकेचे कुलूप चोरट्यांनी तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लांबविले. चौथ्या घटनेत प्रमोद सोमनाथ सहाने (वय 30, रा. कुमार पदमालय, नागरस रोड, औंध) यांचे घर कुलूप लावून बंद करून ते गावी गेले असताना चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून 20 हजारांची रोकड, 17 हजारांचे सोन्याचे दागिने असा 37 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 10 ते 13 ऑगस्ट दरम्यान घडला. याप्रकरणी सहाने यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

Back to top button