पुणे : बसस्टॉपवर भरकटलेल्या आजीसाठी फडकविला ‘मदतीचा ध्वज’ | पुढारी

पुणे : बसस्टॉपवर भरकटलेल्या आजीसाठी फडकविला ‘मदतीचा ध्वज’

सुनील जगताप :

पुणे : परिसर भेकराईनगरचा… वेळ 14 ऑगस्टच्या रात्री साडेनऊची… बसस्टॉपवर एक आजी एकटीच बसलेली… तिच्याच मदतीसाठी एका महिलेला फोन जातो अन् मग सुरू होतो त्या आजीच्या वृद्धाश्रमापर्यंतचा प्रवास..!

काही पोलिस आणि सहकारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या प्रयत्नांनी या वयस्कर महिलेला आधार मिळाला अन् स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जणू मदतीचा अनोखा ध्वजच फडकला. सहकार्य शैक्षणिक-सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शिका वैशाली गायकवाड यांना त्या रात्री फोन आला, ‘साधारण 75 वर्षांच्या आजी बसस्टॉपवर एकट्याच बसल्यात… काही मदत करता येईल का?’ गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आजींची विचारपूस केली.

मात्र, त्यांना काहीच आठवत नव्हते. मग काय पोलिसांशी संपर्क साधला. संस्थेचे अध्यक्ष किरण तुपे, संस्थेचे सदस्य तेजस आंबे, रोहित होले यांनाही कल्पना दिली गेली. ही मंडळी घटनास्थळी पोहचल्यानंतर पोलिसांच्या मदतीने आजीची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे सदस्य नामदेव मारडकर यांनी रात्री 12 वाजता हडपसर पोलिस स्टेशनला संस्थेच्या पदाधिकार्‍यांना बोलावले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली अन् आजींच्या नातेवाइकांचा तपास लागत नाही तोपर्यंत त्यांची राहण्याची सोय करा, असे आवाहन संस्थेला केले.

संस्थेचे अध्यक्ष किरण तुपे आणि मार्गदर्शिका वैशाली गायकवाड यांनीही मग शोधाशोध सुरू केली. अखेर वडकी येथील गंगातारा वृद्धाश्रमाला फोन करून हा प्रकार सांगितला आणि मग रात्री दोन वाजता हडपसर पोलिसांच्या मदतीने त्या आजींना वृद्धाश्रमात पोहचविण्यात आले. वृद्धाश्रमाच्या संचालिका नीता भोसले व अ‍ॅड. लक्ष्मी माने यांनीही त्यांना आश्रमात तत्काळ सामावून घेतले अन् आजींना आधार मिळाला.

याबाबत संस्थेचे अध्यक्ष तुपे म्हणाले, ‘सर्व देश स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत मग्न असताना एका आजीला मदत पोहचविण्यासाठी आमची धावपळ सुरू होती. आता त्या आजींना वृद्धाश्रमात आधार मिळालाय. पोलिसांमार्फत त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला जाईल; परंतु आम्ही मात्र मदतीचा ध्वज फडकविल्याचा आनंद साजरा करीत आहोत.’

Back to top button