पुणे : अमृत महोत्सवाच्या नावाखाली लूट; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप | पुढारी

पुणे : अमृत महोत्सवाच्या नावाखाली लूट; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चीनमधून झेंडे मागविण्यात आले आहेत. या झेंड्यांचा अवमान केला जात आहे. अमृत महोत्सवाच्या नावाखाली केंद्राकडून जनतेची लूट सुरू आहे,’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
पुण्यात काँग्रेस भवन येथे रविवारी (दि.14) झालेल्या पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी अध्यक्ष रमेश बागवे, माजी नगरसेवक अ‍ॅड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, ‘देशाच्या अमृत महोत्सवामध्ये तिरंगा झेंड्याचा वारंवार अवमान केला जात आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राहिला पाहिजे. देशवासीयांचा तिरंगा हा आदर्श आहे. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खरा इतिहास हा जनतेसमोर आणला जाणार आहे. देशाची फाळणी ही हिंदू महासभा व मुस्लिम लीगच्या माध्यमातून करण्यात आली होती, ही खरी बाब समोर आणली पाहिजे.’

‘महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस हे सरकार गुजरात सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. हे सरकार चुकीच्या पद्धतीने आले आहे. घटना अस्तित्वात असलेल्या देशात आता चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. न्याय देताना वेळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे हित पाहण्याऐवजी बुलेट ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे. भाजपाच्या सरकारविरुद्ध बोलणेही अडचणीचे ठरत आहे. आवाज दाबून टाकण्याचे काम केले जात आहे,’ असेही ते म्हणाले

गुन्हे दाखल झाले पाहिजेत
‘चीनमधून असे झेंडे तयार होऊन येत असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण तिरंगा झेंड्याचा अपमान होऊ नये. आमची ओळख या ध्वजापासून सुरू होते, हा अपमान नेहमी केला जात आहे. हे काम जर भारतीय कामगारांना दिले असते तर त्यांना रोजगार मिळाला असता. आता त्यांना देशाला लुटायचे आहे. जसे महाराष्ट्राचे सरकार लोकांना लुटून गुजरातला फायदा करून देते आहे,’ असेही पटोले यांनी सांगितले.

 

Back to top button