पुणे जिल्हा परिषदकडून आर्थिक वर्षाचे वेळापत्रक; मार्गदर्शिका सर्व विभागांना लागू | पुढारी

पुणे जिल्हा परिषदकडून आर्थिक वर्षाचे वेळापत्रक; मार्गदर्शिका सर्व विभागांना लागू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘जिल्हा परिषद आणि मांजरी फार्म येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेने जिल्हा परिषदेतील सर्व कामे वेळेत होण्यासाठी मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये वर्षभराचे वेळापत्रकच तयार आहे. या मार्गदर्शिकेच्या आधारे अधिकार्‍यांना काम करणे सुलभ होईल आणि एकाच वेळी कामाचा ताण येणार नाही,’ असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षासाठी ही मार्गदर्शिका (दिनदर्शिका) तयार करण्यात आली आहे.

त्यामध्ये विविध कायदे, नियम, न्यायालयाचे निवाडे आणि सरकारी निर्णयांनुसार स्थापना, प्रशासन, आर्थिक बाबी, पंचायती राज आणि ग्रामीण विकासाशी संबंधित सर्व माहिती आणि नियोजन देण्यात आले आहे. हे वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि महिन्यांच्या कामांची वर्गवारीदेखील करण्यास मदत करणार आहे. जिल्हा परिषदेत एका परिपत्रकाद्वारे ही मार्गदर्शिका लागू करण्यात आले आहे. मार्गदर्शिका सर्व प्रकारच्या कामे प्रलंबित राहू नये, यासाठी कालमर्यादा ठरवून देणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आणि ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेचे राहुल काळभोर यांनी ही मार्गदर्शिका बनवली आहे. जिल्हा परिषदेसाठी मार्गदर्शिका (दिनदर्शिका) तयार केली असली, तरी ते सरकारी विभागांना लागू असलेल्या नियमांवर आधारित असल्यामुळे एक किंवा अधिक संवर्ग आस्थापना, बजेट हेड आणि योजना व्यवस्थापित करणारे कोणतेही विभाग किंवा सरकारी संस्थादेखील वापरू शकतात, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button