पिंपरी : वाहनांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावाल तर... | पुढारी

पिंपरी : वाहनांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावाल तर...

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वाहनांच्या काचांना काळ्या रंगाच्या फिल्म्स लावलेल्या दिसून येतात. अशा वाहनांवर वाहतूक विभाग आणि परिवहन विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहनांच्या काचांना काळ्या रंगांच्या फिल्म्स लावाल तर सावधान! वाहनांच्या काचांना काळ्या रंगांच्या फिल्म्स लावल्याने त्या वाहनांत कोण बसलेले आहे, याची कल्पना येत नाही. घातपाती कारवाया आणि गैरप्रकार रोखण्यासाठी वाहनांच्या काचांवर कोणतीही वस्तू चिकटवू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

त्यामुळे वाहनांच्या काचांना काळ्या रंगांच्या फिल्म्स लावणे बेकायदा आहे. मात्र शहरात सध्या अनेक वाहनांना काळ्या रंगांच्या फिल्म्स लावल्याचे दिसून येते, अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. पूर्वी काही महत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या काचा चाळीस ते सत्तर टक्के पारदर्शक ठेवल्या जात असत; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कुठल्याच वाहनांना काळ्या रंगांच्या फिल्म्स लावता येत नाहीत; परंतु या नियमाची वाहन चालकांकडून सर्रास पायमल्ली होताना दिसून येत आहे. काळ्या रंगांच्या फिल्म्स लावलेल्या वाहनांमधून बलात्कार, खून, असे गुन्हे घडले आहेत. तर चोरी, दरोडे अशा घटनांचे प्लॅन ठरविले जात आहेत.

आरटीओची कारवाई
एप्रिल 2021 ते जुलै 2022 दरम्यान
दोषी वाहने निकाली उत्पन्न
एकुण 172 39 21,000

Back to top button