वायसीएममध्ये घरघर ! उपचारासाठी वाढला टाईम | पुढारी

वायसीएममध्ये घरघर ! उपचारासाठी वाढला टाईम

दीपेश सुराणा : 

पिंपरी : महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरावे लागत आहे. त्यातही उपचारासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक या धावपळीने थकून जातात. रुग्णालयात येणार्‍या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने आणि तुलनेत मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने रुग्णांवरील उपचाराचा ‘टाईम’ वाढला आहे. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 750 खाटांची सोय आहे. मात्र, तातडिक सेवा विभाग, लेबर वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्षात शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्ण ठेवण्यासाठी ट्रॉन्झिटरी बेड लागतात. अशा एकूण 80 ते 100 खाटा त्यामध्ये अडकून पडतात. त्यामुळे पूर्ण क्षमतेने रुग्णालयातील खाटांचा वापर करता येत नसल्याचे सध्या वास्तव चित्र आहे.

महिला व ज्येष्ठांची गैरसोय
रुग्णालयात उपचार घेण्यास येणार्‍या रुग्णांना कर्मचार्‍यांकडून योग्य माहिती दिली जात नाही. त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिक यांना विविध विभागांमध्ये उपचारासाठी फिरावे लागत आहे. केसपेपर काढण्यासाठी रांगा, औषधे घेण्यासाठी रांगा, वॉर्डांमध्ये उपचारासाठी रांगा, तातडीक सेवा विभागात रांगा, असेच चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यासाठी विलंब होत आहे.

तातडीची सेवा विभागात प्रतीक्षा ठरलेली
तातडीक सेवा विभागात सध्या केवळ 25 खाटा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्याशिवाय, या विभागात अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे एखाद्या गंभीर रुग्णावर उपचार सुरू असताना अन्य रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच, रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा ही ठरलेली आहे. येथे झोननिहाय रुग्णांवर उपचार केले जातात. पुढील 10 ते 15 मिनिटांत उपचार न मिळाल्यास जे रुग्ण दगावू शकतात, असे रुग्ण रेडझोनमध्ये येतात. त्यांना पहिले प्राधान्य दिले जाते. स्थिर झालेल्या रुग्णांचा यलो झोनमध्ये समावेश केला जातो. त्यांना दुसरे प्राधान्य देण्यात येते. तर, ज्यांना वॉर्डमध्ये हलवायचे आहे, अशा रुग्णांचा ग्रीन झोनमध्ये समावेश करून त्यांच्याकडे सर्वात शेवटी लक्ष दिले जाते.

माझ्या पत्नीच्या डोक्यावर शस्त्रकियेसाठी 20 ते 22 दिवसांनंतर नंबर लागला. त्यानंतर ही शस्त्रक्रिया झाली. सध्या त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. मात्र, शस्त्रक्रियांसाठी कराव्या लागणारी प्रतीक्षेचा कालावधी कमी व्हायला हवा.
                                                – भगवान ओझरकर, रुग्णाचे नातेवाईक

मला फीट येण्याचा त्रास होत असल्याने मी 15 दिवस रुग्णालयात उपचार घेत होतो. मला उपचारांसाठी रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये चकरा माराव्या लागल्या. रुग्णालयात औषधे न मिळाल्याने बाहेरून आणावी लागली.
                                                    – माधव रोकडे, रुग्ण

वायसीएममधील तातडीक सेवा विभागात मुबलक जागा उपलब्ध नाही. तसेच, मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते. येथे गंभीर रुग्णांना पहिले प्राधान्य द्यावे लागते. अन्यथा, त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महापालिका कर्मचारी तसेच जुने केसपेपर काढण्यासाठी एकूण 3 खिडक्या वाढविल्या आहेत. उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना नेमके कोणत्या विभागात उपचारासाठी जायचे आहे, याबाबत सिक्युरिटी गार्ड, केसपेपर देणारे कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यास सांगितले आहे. तसेच, चौकशीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय व पदव्युत्तर संस्था

Back to top button