जुुन्नर तालुका सुसंस्कृत घडावा, यासाठी कटिबद्ध: आमदार अतुल बेनके यांचे प्रतिपादन | पुढारी

जुुन्नर तालुका सुसंस्कृत घडावा, यासाठी कटिबद्ध: आमदार अतुल बेनके यांचे प्रतिपादन

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: तालुक्याचा आमदार या नात्याने तालुक्यातील महिलावर्गाच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे. माजी आमदार वल्लभ बेनके यांनी पाडलेल्या पायंड्याप्रमाणे मीही तालुक्यातील जनतेच्या सुख-दुःखात नेहमी उभा राहणार आहे. पुढची पिढी सुसंस्कृत घडावी, यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली. वल्लभ बेनके हे आमदार झाल्यापासून त्यांच्या घरी रक्षाबंधन सण साजरा करण्याची परंपरा आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे हा सण साजरा होऊ शकला नाही. या वर्षी वल्लभ बेनके यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यास तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दिवसभरात तालुक्यातील ठिकठिकाणांहून आलेल्या सुमारे साडेसात हजार महिलांनी आमदार अतुल बेनके यांना राखी बांधली. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. राखी बांधणार्‍या महिला ह्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातील होत्या. याबाबत आमदार अतुल बेनके म्हणाले की, माता भगिनींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. कार्यक्रमाचे नियोजन युवानेते अमित बेनके, गौरी बेनके, धनश्री बेनके, शीतल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उन्नती फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी यांनी केले.

Back to top button