करंजे-सांगवी मार्गावर 3 वर्षांनी धावली लालपरी | पुढारी

करंजे-सांगवी मार्गावर 3 वर्षांनी धावली लालपरी

भोर; पुढारी वृत्तसेवा: करंजे-सांगवी भिडे (ता. भोर) येथील पुलाचे काम पूर्ण झाल्यावर तीन वर्षांनंतर लालपरी धावल्याने प्रवासी आनंदी झाले होते. आंबवडे भागातील लोकसंख्येने मोठे असलेल्या कारी या ऐतिहासिक गावास भोर- आंबेघर- करंजे – सांगवी मार्गे कारी अशा एसटी महामंडळाच्या भोर आगारातून चार-पाच फेर्‍या असायच्या, परंतु तीन वर्षांपासून करंजे- सांगवीदरम्यानच्या ओढ्यावरील पूल नादुरुस्त असल्याने या पुलावरून जडवाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती.

पूल वाहतुकीस योग्य नसल्याने या ठिकाणी नवीन पूल मंजूर करण्यात आला होता.,परंतु निधी उपलब्ध होऊनही पुलाचे काम संथ गतीने झाल्याने पुलाच्या कामास विलंब लागला. नवीन पुलाचे काम पूर्ण होऊन ही नवीन पुलासमोरील टेकडीचे खोदकाम व पुलास जोडणारा रस्ता नसल्याने गेले वर्षभर रस्ता वाहतुकीस खुला करता आला नाही. या मार्गावरून एसटी सेवा बंद असल्याने गेली तीन वर्षे करंजे व सांगवी भिडे या ग्रामस्थांना कधी पायपीट तर कधी खासगी वाहनांसाठी तासन तास ताटकळत बसत आर्थिक तोटाही सहन करावा लागला.

विद्यार्थ्यांची तर रोजचीच पायपीट ठरलेली होती. नुकतेच पुलाचे काम पूर्ण झाल्याने सर्वसामान्यांची लालपरीची प्रतीक्षा संपली असून आज तीन वर्षांनी या करंजे – सांगवी मार्गांवरून लालपरी धावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पहिल्या फेरीला आलेल्या एसटी बसचालक- वाहक यांचा करंजे व सांगवी ग्रामस्थांनी सत्कार करून लालपरीचे स्वागत केले.

Back to top button