

पिंपरी : उघड्यावर पडणारा कचरा आणि त्यावर चरत असलेली भटकी जनावरे हे चित्र बदलण्याचा विडा महापालिकेने उचलला आहे. पालिकेतर्फे गवळीमाथा झोपडपट्टीमध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्यात येणार आहे. या झोपडपट्टीमधील ओल्या कचर्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग सुरू करण्यात येणार आहे. सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी क क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत शून्य कचरा झोपडपट्टी उपक्रम सुरू करण्यासाठी नियोजन केले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून वस्तीतील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई प्रकल्प नवी दिशा संस्थेच्या माध्यमातून सुरू केल्यानंतर या प्रकल्प निर्मितीला चालना मिळाली आहे.
त्याच अंतर्गत गवळीमाथा झोपडपट्टीमध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्यात येणार आहे. येथील ओल्या कचर्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. या झोपडपट्टीमधील ओला कचरा नेहरूनगर येथील गुलाब पुष्प उद्यानात आणला जाणार आहे. त्यातून खत निर्मिती करण्यासाठीची तयारी महापालिकेने केली आहे. क क्षेत्रीय परिसरातील नागरिकांना डिवाईन संस्थेमार्फत कचरा अलगीकरणाबाबत जनजागृती, प्रबोधन केले जात आहे. सध्या या झोपडपट्टीमधील ओला व सुका कचरा वर्गीकरण करून बीव्हीजी या संस्थेच्या वाहनांद्वारे उचलून मोशी कचरा डेपोपर्यंत नेला जातो. यामध्ये वाहतूक खर्चा सोबतच वेळेचादेखील अपव्यय होत आहे. त्यामुळे मिशन झिरो वेस्टेज येथे राबवण्यात येणार आहे.
गवळीमाथा झोपडपट्टीमध्ये दैनंदिन ओला कचरा 358 किलो आणि सुका कचरा 279 किलो कचरा निर्माण होतो. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प उभारला जात आहे. क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते, राजेंद्र उज्जिनवाल, आरोग्य निरीक्षक क्षितिज रोकडे हे हा प्रकल्प यशस्वी राबविण्यासाठी काम करीत आहेत. 16 ऑगस्टरोजी आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
उद्यानामध्ये देणार खत
गवळीमाथा झोपडपट्टीमधून दररोज 637 किलो कचरा गुलाबपुष्प उद्यानात आणला जाणार आहे. या उद्यानामध्ये खत निर्मितीसाठी तीन 'पीट' तयार करण्यात आले आहेत. यामध्ये दररोजचा कचरा डंप करून त्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यापासून खतनिर्मिती होणार आहे. यामध्ये महिला बचत गटांची मदत घेतली जाणार आहे. कचर्यापासून तयार झालेले खत विविध महापालिकेच्या उद्यानांपर्यंत पोहोचवायचे काम बचत गटांच्या माध्यमातूनच केले जाणार आहे.