वालचंदनगर : प्रतिकूल परिस्थितीवर ‘विजय’; रेडणीतील युवकाचे यूपीएससी परीक्षेत यश | पुढारी

वालचंदनगर : प्रतिकूल परिस्थितीवर ‘विजय’; रेडणीतील युवकाचे यूपीएससी परीक्षेत यश

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: रेडणी (ता. इंदापूर) येथील विजय संजय देवकाते या युवकाने जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्याची आता सनदी अधिकारीपदी निवड होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, या परीक्षेत विजयला यश मिळाले आहे. त्याने देशामध्ये 92वा, तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक सुरू असून त्याने तालुक्यातील युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

विजय याचे मूळ गाव बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. गेल्या 13 वर्षांपूर्वी त्याच्या आजीची दोन एकर शेतजमीन मिळाल्याने विजयचे कुटुंब रेडणी गावामध्ये स्थलांतरीत झाले होते. वडील संजय व आई रोहिणी मजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवत होते. अशा परिस्थितीत विजय मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होता. मिळेल तेवढ्या पैशात तो पुणे येथे राहून परीक्षेचा अभ्यास करत होता. त्याच दरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये विजयच्या वडिलांचे निधन झाले.

त्यामुळे विजयला स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून गावाकडे यावे लागले होते. आधीच परिस्थिती बेताची त्यातच वडिलांचे छत्र हरपल्याने विजयवर आभाळ कोसळले होते. मात्र, अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या विजयने हार न मानता पुन्हा पुणे गाठले. त्याने ‘पार्टटाईम जॉब’ करून नव्या जोमाने परीक्षेची तयारी सुरू केली आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विजय अखेर आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचला. यशाबद्दल त्याचे इंदापूर तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Back to top button