हडपसर : स्वातंत्र्याचे पहिले बीज पुण्यातून : मुख्यमंत्री बोम्मई | पुढारी

हडपसर : स्वातंत्र्याचे पहिले बीज पुण्यातून : मुख्यमंत्री बोम्मई

हडपसर; पुढारी वृत्तसेवा: ‘देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे पहिले बीज लोकमान्य टिळकांनी पुणे शहरातून पेरले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची कल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडली. शतकमहोत्सवापर्यंत देश विश्वगुरू करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे,’ असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित ‘घर घर तिरंगा’ अभियानाची सुरुवात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाली.

या वेळी ते बोलत होते. कर्नाटक राज्यातील सर्व देवस्थानांना सरकारने स्वायत्तता दिल्याबद्दल त्यांची ग्रंथतुला करून महासंघाच्या वतीने विशेष सत्कारही करण्यात आला. येथील अमनोरा टाऊनशीपमधील फर्न क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे होते. पंडित वसंतराव गाडगीळ, ब्राह्मण महासंघाच्या ब्राह्मोद्योगचे उपाध्यक्ष त्रिविक्रम जोशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सी. रमणाचार्य, श्याम रघुनंदन, भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकारी सी. टी. रवि आदी या वेळी उपस्थित होते.

बोम्मई म्हणाले, ‘भविष्यात निश्चितपणे आपला देश जगाचे नेतृत्व करू शकेल. ज्ञान हे या काळातील मोठे साधन आहे. ब्राह्मण समाजाकडे ते आहे. हे आपले भाग्य आहे. पुणे आणि बंगळूर ही शहरे देशातील महत्त्वपूर्ण असून माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत ती देशाला मार्गदर्शक आहेत.’

Back to top button