उपनगरात खड्डे अन् चिखलाचे साम्राज्य; हांडेवाडी परिसरातील नागरिक त्रस्त | पुढारी

उपनगरात खड्डे अन् चिखलाचे साम्राज्य; हांडेवाडी परिसरातील नागरिक त्रस्त

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा: मंतरवाडी-कात्रज मार्गावरील हांडेवाडी पालिका कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्‍या स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हांडेवाडी गावाचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आला आहे. मात्र, महापालिकेकडून अपुर्‍या सुविधा देण्यात येत असल्यामुळे या गावातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे.

पालिकेच्या हांडेवाडी कार्यालयात विविध कामांसाठी नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. तसेच, परिसरात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असल्यामुळे विद्यार्थीही या ठिकाणाहून ये-जा करीत असतात. मात्र, संततधार पावसामुळे येथील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साठून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना, शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांना या चिखलातून वाट काढत पुढे जावे लागत आहे. लहान विद्यार्थी याठिकाणच्या चिखलामध्ये घसरून पडण्याच्या घटनाही घडत आहेत.

औताडे-हांडेवाडीसह 23 गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर महापालिकेकडून याठिकाणी कर आकारणी सुरू झाली. मात्र, त्याप्रमाणात कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नाहीत. विकासकामे ठप्प झाल्याने पालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी होती, अशी म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. या गावातील अंतर्गत रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा, क्षेत्रीय कार्यालयापुढे चिखलफेक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हांडेवाडीचे माजी उपसरपंच अशोक न्हावले यांनी दिला.

 

Back to top button