पुणे : फ्रँचायजीच्या बहाण्याने महिलेला सायबर चोरट्यांचा गंडा | पुढारी

पुणे : फ्रँचायजीच्या बहाण्याने महिलेला सायबर चोरट्यांचा गंडा

पुणे : केएफसी रेस्टॉरंटची फ्रँचायजी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल 79 लाख 76 हजार 500 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गोखलेनगरमधील एका 46 वर्षांच्या महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 मार्च ते 24 मे 2022 दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रिअल इस्टेट क्षेत्रात कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा होता, त्यासाठी त्यांनी ऑनलाईन संकेस्थळावर केएफसीच्या फ्रँचायजीची माहिती शोधली होती.

एकेदिवशी केएफसी रेस्टॉरंट प्रा. लि. नावाने केएफसी फ्रँचायजी मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने त्यांच्याशी संपर्क साधला. केएफसी रेस्टॉरंटचे प्रतिनिधी म्हणून गौरव निगम, राहुल शिंदे, राहुल मॅथ्यू अशा वेगवेगळ्या नावाने संपर्क साधून त्यांना फ्रँचायजी देण्याचा बहाणा केला. त्यांना खोटे इन्व्हॉईस/दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासविले. त्यासाठी त्यांनी केएफसी फ्रँचायजीसारखे हुबेहूब लोगो, चिन्ह वापरून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात 79 लाख 76 हजार 500 रुपये भरायला लावले.

फिर्यादी महिलेनेदेखील त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ते सांगतील त्याप्रमाणे वेळोवेळी पैसे भरले. मात्र, काही कालावधीनंतर सायबर चोरट्यांचा संपर्क होणे बंद झाले. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार, त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. सहायक पोलिस निरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.

Back to top button